भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मास्क आणि सॅनिटायझरचा अवैध साठा जप्त

भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मास्क आणि सॅनिटायझरचा अवैध साठा जप्त

मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला असून त्याची चढ्या भावाने विक्री होत आहे

  • Share this:

विजय कमळे पाटील,जालना

जालना, 20 मार्च : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या जालन्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मास्क आणि सॅनिटायझरचा लाखोंचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा, वजन व मापे निरीक्षण विभाग, सदर बाजार पोलीस स्टेशन आई जीएसटी विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. शहरातील गणेश जीन भागात असलेल्या कल्पना एम्पोरियम या दुकानात ही कारवाई करण्यात आली.

राज्यात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला असून त्याची चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आज शहरातील काही दुकानांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये कल्पना एम्पोरियम या दुकानात अवैधरित्या साठवलेले 18 हजार 900 मास्क आणि 730 सॅनिटायझर बॉटल असा एकूण 6 लाखांचा माल जप्त करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या साठेबाजी आणि काळाबाजारमुळे मास्क आणि सेनिटायझर चा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आलेला असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सदर दुकान हे भाजपच्या व्यापारी सेलचे राज्य उपाध्यक्ष हस्तीमल बंब यांची असल्याची प्राथमिक माहिती असून आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मास्क आणि सॅनिटायझरचा लाखोंचा अवैध साठा जप्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 49 वर

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांची संख्या 49 वर पोहोचली आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरू ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

4. दुकानांच्या वेळा ठरविणार

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.

5. साधनसामुग्रीची उपलब्धता

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2020 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading