काँग्रेससोबत युती न झाल्यास राज्यात तिसरा पर्याय देऊ - प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत युती न झाल्यास राज्यात तिसरा पर्याय देऊ - प्रकाश आंबेडकर

"एमआयएम पक्षासोबत आमची युती झाली आहे, ती तुटणार नाही"

  • Share this:

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 27 डिसेंबर :  "काँग्रेससोबत आघाडीबाबतची चर्चा आहे तिथेच आहे, पुढे गेली नाही. कॉंग्रेसबरोबर युती न झाल्यास आम्ही राज्यात समविचारी पक्षांना सोबत घेऊन पर्यायी आघाडीचा पर्याय देऊ" अशा शब्दांत भारीपचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

अमरावतीमध्ये आज गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं. "आता काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडीसाठी चर्चा करणार नाही, आम्हीच आता काँग्रेससाठी जागा सोडू" असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं आहे.

"कॉंग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मनी आहे, भाजप हार्ड तर काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी आहे, म्हणून आम्ही काँग्रेससोबत जाणे पसंत केलं होतं, पण काँग्रेसला गरज नसेल तर आम्ही काय करू शकतो हे काँग्रेसला दाखवून देऊ", असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.

"एमआयएम पक्षासोबत आमची युती झाली आहे, ती तुटणार नाही",असा पुनरूच्चार सुद्धा आंबेडकर यांनी केला.

मागील आठवड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये  "प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला आघाडीत यायचं असेल तर ओवेसींच्या एमआयएम या पक्षाला दूर ठेवावं लागेल", अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली होती. याबाबतचा निरोपही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना पाठवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यावर आज प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

============================

First published: December 27, 2018, 4:00 PM IST

ताज्या बातम्या