राज्यात पुन्हा 1995चा फॉर्म्युला; शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्षासाठी आणि...

राज्यात पुन्हा 1995चा फॉर्म्युला; शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्षासाठी आणि...

राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर: राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक आणि ठामपणे मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा केला आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. पवारांच्या या भेटीमुळे राज्यात नवे सत्तासमीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी होण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस अशा सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकते. अर्थात यासाठी शिवसेना आणि भाजप यांची महायुती संपुष्ठात आली पाहिजे.

राज्यात पुन्हा 1995चा फॉर्म्युला

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 1995चा फॉर्म्युला सुचवला आहे. राज्यात 1995 सर्व प्रथम युती सरकार सत्तेत आले होते. तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री 5 वर्षासाठी होता तर भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद होते. आता पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला सत्तास्थापनेसाठी वापर केला जाऊ शकतो. पण यावेळी या फॉर्म्युल्यात बदल असणार आहे. हा बदल म्हणजे शिवसेने सोबत मित्रपक्ष भाजप असणार नाही तर त्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस काही महत्त्वाच्या खात्यांवर समाधानी होऊ शकते. यात गृह, अर्थ, महसूल यासोबत विधानसभेचे अध्यक्षपद याचा समावेश असू शकतो.

या फॉर्म्युल्यात आणखी एक बदल होऊ शकतो म्हणजे सेनेचा 5 वर्षे मुख्यमंत्रीपद आणि 2 उपमुख्यमंत्री, दोनपैकी एक सेनेचा एक राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल. यामध्ये जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला तर बदल होऊ शकतो. अद्याप तरी त्यांनी आपण राज्याच्या राजकारणात उतरणार नसल्याचंच म्हटलं आहे. मात्र, अद्याप याबाबत सेनेकडून कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आलेला नाही.

मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचा नकार

जर शिवसेनेने पाठिंबा दिला तर मुख्यमंत्रीपद स्विकारणार का या प्रश्नावर शरद पवार यांनी नकार दिला. जर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तसा प्रस्ताव दिला तर राज्यात नव्या समीकरणाची शक्यता नाकारता येत नाही. पण यासाठी शिवसेनेने केंद्र सरकारमधून बाहेर पडणे गरजेचे आहे असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 12:19 PM IST

ताज्या बातम्या