नवी दिल्ली, 18 जुलै : भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना ICC Cricket World Cup स्पर्धेतनंतर उधाण आलं आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरोधात झालेली सेमीफायनल धोनीचा शेवटचा सामना असेल, अशा बातम्यांनंतर आता मात्र धोनी एवढ्यात निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने धोनीकडेच मदत मागितली आहे.
'महेंद्रसिंह धोनी एक अनुभवी खेळाडू आहे. पण भविष्यात ऋषभ पंत त्याची जागा घेऊ शकतो. असं असलं तरीही पंत हा स्थिरावेपर्यंत धोनीने त्याला मदत करावी. तसंच विविध आघाडय़ांवर संघाला धोनीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. धोनीही संघाला मदत करेल,' असं बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये धोनी संघात नसेल आणि तो काही दिवसांत निवृत्त होईल अशी चर्चा आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. त्याआधी त्याला मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे
निवड समितीनं धोनीच्या जागा कोण घेणार यासाठी तयारी सुरु केली आहे. धोनी 38 वर्षांचा असल्यामुळे 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तो भारताकडून खेळण्याच्या शक्यता कमी आहेत. त्यामुळं भारताला पुढच्या वर्ल्ड कपसाठी विकेटकिपर आणि फिनिशर अशा दोन्ही भूमिका बजावणारा खेळाडूची गरज आहे. यात आयपीएल गाजवणाऱ्या ऋषभ पंत, इशान किशन किंवा संजू सॅमसन यांची वर्णी लागू शकते. या तिघांमध्ये ऋषभ पंत आघाडीवर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी जोपर्यंत ऋषभ पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनीला खेळण्याची विनंती केली आहे. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल. तसेच धोनी पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्येही चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार आहे. त्यानंतर धोनी टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या