नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 8 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे विराट कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्तीच्या दंगलीची मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. दरम्यान, यावेळी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्यक्ष कुस्ती व राजकीय कुस्तीमध्ये फार फरक असतो.
प्रत्यक्ष कुस्ती खेळताना ताकदीने खेळावी लागते तर राजकीय कुस्ती खेळताना डोक्याने खेळावी लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, राजकीय कुस्तीसाठी अजून दोन वर्ष बाकी असून मी कोणासोबतही कुस्ती खेळायला तयार आहे, असा थेट इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
गुलाबराव पाटील-सुषमा अंधारे वाद -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं.
हेही वाचा - 'हा धृतराष्ट्र नाही तर...', फडणवीसांच्या 'खंजीर अन् बदला'वर ठाकरेंचा पलटवार
सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला.
सुषमा अंधारेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार
गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युतर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांचा माज संविधानिक पद्धतीने उतरवणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
'गुलाबराव पाटील ज्या पातळीवर उतरले त्यावर मी उतरू शकत नाही. तुम्ही अश्लाघ्य आणि सवंग टिप्पणी करून माझ्या बाईपणावर हल्ला करण्याचा आणि मला नामोहरम करण्याचा जो बालीश प्रयत्न करत आहात, त्यावरून मला तुमची कीव करावीशी वाटते, तुमची भाषा तुमचा माज दाखवणारी आहे. परंतू मी बाईपणाचं कोणतंही व्हिक्टीम कार्ड खेळणार नाही. तुमचा सरंजामी माज संविधानिक पद्धतीने उतरवून दाखवेन,' असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.