शिर्डी, 10 एप्रिल : राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते असून विखे पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सगळ्यांना बुचकळ्यात पाडणारं एक वक्तव्य केलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अहमदनगर जिल्ह्यातही काँग्रेस आघाडीसाठी काम करतील असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे टीका होती की त्यांचा विखे पाटीलांवरचा विश्वास होता याबाबत आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय मतभेद सर्वश्रृत आहे. पण अशा परिस्थितीत थोरातांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहीजे हे वक्तव्य अनेकांना बुचकळ्यात पाडणारं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून राजकीय तर्क लावण्यात येत आहेत.
सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लगेच राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मुलानंतर आता राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र, ते काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ते असा काही निर्णय घेतील असं वाटत नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद असतात. मात्र, यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही थोरात यांनी व्यक्त केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला...PM मोदींच्या उपस्थितीत हाती घेणार 'कमळ'
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.
मुलांपाठोपाठ हे ज्येष्ठ नेतेही करणार भाजप प्रवेश
राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांपाठोपाठ आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.
विखे पाटील म्हणाले होते.. काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार
राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबुली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षात काय सुरू आहे याचा विचार पक्षातल्याच नेत्यांनी केला पाहिजे. सुजयने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे. त्याने पूर्ण जबाबदारीने तो निर्णय घेतला आहे. गेली तीन वर्ष तो या भागात काम करतो आहे. राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर आघाडीला झटका बसला नसता.
VIDEO: 'अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो'; वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची सटकली