खानापूर, 04 जानेवारी : महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. एकदाच 42 जागांवर मंत्रिपदाची घोषणा केल्यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुक आमदार नाराज झाले आहे. परंतु, मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही तर माझी नाराजी ही सरकारच्या कामाच्या बाबतीत आहे, असं म्हणत सेनेचे आमदार अनिल बाबर यांनी सरकारला घरचा अहेर दिला.
खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळणार अशी दाट शक्यता अंतिम क्षणापर्यंत होती. मात्र, त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आमदार बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अनिल बाबर राजीनामा देणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज अनिल बाबर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
विटा येथे पार पडलेल्या अनिल बाबर समर्थकांच्या मेळाव्यात आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून, घेत संयम राखण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
तसंच, 'आपल्यालाही मंत्रिपद हवं ही आपली इच्छा होती मात्र मिळालं नाही. त्यामुळे आपण नाराज नाहीट, असं स्पष्टीकरण अनिल बाबर यांनी यावेळी दिलं.
आपण पक्षाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. त्याचबरोबर बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिपद आणि खातेवाटपाच्या सुरू असलेल्या घोळाचा पार्श्वभूमीवर सरकारला घरचा अहेर दिला.
मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून माझी नाराजी नसून सरकारच्या कामाच्या बाबतीत आहे. कारण 3 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरी अजून मंत्रिपदं वाटपाचा घोळ सुरू आहे. पण अजून खातेवाटप झाले नाही. त्यामुळे जे खाते मिळेल ते घेऊन जास्त रस्सीखेच न करता तिन्ही पक्षांनी आता लोकांची कामे सुरू करावीत. लोकांना सरकारकडून अपेक्षा आहे, असं मत आमदार अनिलर बाबर यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेते अर्जुत खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत तसं घडलंच नाही आणि ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.