रवी शिंदे, प्रतिनिधी
भिवंडी, 24 फेब्रुवारी : भिवंडी शहरातील श्रीरंगनगर परिसरात राहणाऱ्या पती- पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने आठ महिन्याच्या बाळासमोरच पत्नीच्या गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. सपना अरविंद केशरवानी ( वय 27 ) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव असून बाळाच्या रडण्यामुळे हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पदमानगर भागातील श्रीरंगनगर येथील इमारतीत मयत सपना पती अरविंद पुरुषोत्तम केसरवानी याच्यासोबत राहत होती. अरविंद हा वेताळपाडा इथं ओम साई नावाचे मोबाईल दुकान चालवत होता. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी संतप्त झालेल्या पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नी सपनाच्या गळ्या भोवती ब्लॅंकेट आवळून आणि तोंडावर उशी दाबून तिची हत्या करून तो पसार झाला.
त्यांना एक मुलगी आणि आठ महिन्याचा मुलगा असून मुलगी गावी आहे. मात्र, हत्या झाल्यानंतर आठ महिन्याचा मुलगा रडू लागल्याने त्याचा आवाज शेजारील नागरिकांना आला असता त्यांनी पाहणी केली. मात्र, घराला कुलूप असल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुलूप तोडून पाहणी केली असता सपना यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
या घटनेची माहिती समजल्यावर नातेवाईकांनी धाव घेऊन याबाबत शहर पोलीस ठाण्यात अरविंद विरोधात तक्रार दाखल केली. नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधातहत्येचा गुन्हा दाखल केला. फरार पतीचा पोलीस शोध घेत आहेत.
या अगोदर सुद्धा अरविंदने सपना हिला मारहाण केली होती. या प्रकरणी पतीवर गुन्हाही दाखल केला होता. मात्र, गोडी गुलाबीने तो गुन्हा सपना हिला मागे घेण्यास भाग पाडलं होतं. आरोपी अरविंद हा सपना सोडण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे.