रत्नागिरी, 27 जून: पत्नी सतत शिवीगाळ (Abuse) करत त्रास देते, म्हणून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण (Husband Killed Wife) हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीनं पत्नीच्या बहिणीकडे जाण्याचा बहाणा करत वाटेतच तिची हत्या केली आहे. यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याचा बनाव पतीनं रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येचं गूढ उलगडलं आहे. पोलिसांनी आरोपीवर प्रश्नांचा भडीमार करत त्याचं बिंग फोडलं आहे. अखेर आरोपीनं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सिद्धी ऊर्फ विद्या गजानन भोवड असं हत्या झालेल्या 35 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. ती राजापूर तालुक्यातील परुळे सुतारवाडी येथील रहिवासी आहे. मृत सिद्धी आपला पती गजानन भोवड सोबत सामायिक कुटुंबात राहात होत्या. शुक्रवारी दुपारी दोघंजण पत्नी सिध्दीच्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते. वाटेत असलेलं वहाळ पार करुन दोघंही बाजूच्या जंगलातून चालत चालले होते. दरम्यान पती गजाननं अचानक सिध्दीचं नाक आणि तोंड दाबून धरलं. या घटनेत सिद्धीचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, एका अज्ञात व्यक्तीनं आपल्या पत्नीला जंगलात ओढत नेलं. यानंतर तिचा थेट मृतदेह आढळल्याचा बनाव पतीनं रचला. तसेच राजापूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देखील दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलीसांनी हत्येच्या तपासाला सुरुवात केली. मुख्य संशयित आरोपी म्हणून सुरुवातीपासूनच पोलिसांना पतीवर संशय होता.
हेही वाचा-महाराष्ट्र हादरला! छळ करुनही समाधान नाही, सासरच्यांनी विष देऊन सुनेला संपवलं
याप्रकरणी पोलिसांनी पती गजाननला चौकशीसाठी घेतला असता, त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरू केलं. एका अज्ञात व्यक्तीनं तिला ओढत नेलं. यामुळे ती मृत पावली असंच तो वारंवार सांगत होता. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला होता. यानंतर अखेर त्यानं पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पत्नी सिध्दी नेहमी शिवीगाळ करत त्रास द्यायची, त्यामुळे तिची हत्या केल्याचं आरोपी पतीनं पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.