बायकोला मारताना मुलगा रडत होता, बापाने त्यालाही बॅटने मारले, चिमुरड्याने सोडला जीव

बायकोला मारताना मुलगा रडत होता, बापाने त्यालाही बॅटने मारले, चिमुरड्याने सोडला जीव

या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे या संशयित आरोपीला बेड्या ठोकत त्यास गजाआड केलंय

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 11 फेब्रुवारी : पती-पत्नीच्या वादात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा नाहक बळी गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी नराधम पित्याला नाशिक पोलिसांनी गजाआड केलं आहे. मात्रस यात लहान मुलांचा जीव गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती पत्नीच्या वादात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आर्यन खंडारे असं मृत्यू झालेल्या चिमुरड्याच नाव असून गेल्या चार दिवसांपूर्वी या मुलाचा बाप आणि आई यांच्यात किरकोळ वादातून भांडण झालं होतं. याच भांडणात भीमराव खंडारे याने  आपल्या पत्नीसह पाच वर्षांच्या आर्यनला मारहाण केली. या मारहाणीत आर्यनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांनी भीमराव खंडारे या संशयित आरोपीला बेड्या ठोकत त्यास गजाआड केलंय. यात पोलिसांनी संशयित आरोपी भीमराव खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत मारहाणीत वापरलेली बॅटही ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वीही चारित्र्याच्या संशयावरून वाद झाले आहेत. मात्र, घटनेच्या दिवशी संशयित भीमराव खंडारे याने आपल्या पत्नीला मारहाण करत असताना आर्यन रडत असल्यानं त्याने आर्यनलाही बॅटने मारहाण केली आणि यातच आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या संतापजनक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

गोणीत आढळला बेपत्ता 60 वर्षीय महिलेचा मृतदेह!

दरम्यान, बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.  बेपत्ता मंदाकिनी पाटील यांची हत्या झाल्यानं या प्रकरणातील गूढ वाढलंय.

नाशिकच्या उपनगरच्या जेलरोड येथील ६० वर्षीय महिला मंदाकिनी पाटील 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याबाबत उपनगर पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद ही कुटुंबीयांनी केली होती. इतकंच नव्हे तर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी महिला शोधून दिल्यास २५ हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केलं होतं.

मात्र, मंगळवारी दुपारच्या सुमारास घराजवळ असलेल्या मोकळ्या भूखंडाजवळून वास येत असल्यानं आजूबाजूच्या नागरीक शोध घेतला त्यावेळी गोणीत बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.

उपनगर पोलिसांनी याबाबत पंचनामा करत खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय. शवविच्छेदन करण्यासाठी महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2020 08:30 PM IST

ताज्या बातम्या