Home /News /maharashtra /

#HumanStory: पाळी आल्यावर सुट्टी टाकली की कापला जायचा पगार, 24 वर्षांच्या तरुणीने कंटाळून काढलं गर्भाशय...

#HumanStory: पाळी आल्यावर सुट्टी टाकली की कापला जायचा पगार, 24 वर्षांच्या तरुणीने कंटाळून काढलं गर्भाशय...

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

खरंतर मलाही यातून सुटायचं होतं कारण कंत्राटदार रोज म्हटलं तरी छेडायचा. त्यातून मुल राहण्याची मला भीती होती.

    बीड, 28 जानेवारी : चौदा वर्षांच्या जनाबाईला सफेद घोड्यावर येणाऱ्या राजकुमाराची स्वप्न बघण्याचा वेळच नाही मिळाला. एक दिवस कामावरून परत आल्यानंतर लग्नाची बोलणी सुरू असल्याचं ऐकलं. वर्षभरातच, ती तिच्या मांडीवर एका महिन्याच्या बाळासह ऊस तोडण्यासाठी गेली. घरं म्हणजे लाकडाचं आणि चटईचं छप्पर. 14-15 तास काम. रोज हात रक्ताने माखायचे. उसाची मोळी उचलून कंबर आणि मानेमध्ये वेदना. इतक्यात 'पीरियड्स' आले. रजा घेतली तर घरी ठेकेदार आला. शिवीगाळ केली. एकटी असल्याचं पाहून त्याने विनयभंग केला आणि निघून गेला. बरं त्याने सुट्टीचे पैसे कापले ते वेगळंच. वयाच्या 23 व्या वर्षी जनाबाईची शस्त्रक्रिया झाली. ती सांगते- गर्भाशय काढून टाकल्यामुळे आता कंबरेमध्ये वेदना आहेत. ताप येतो. ऊस तोडीचं काम सुटलं आणि नवरासुद्धा. 'एक गोष्ट चांगली आठवते ती म्हणजे, प्रतीक्षा (वाट पाहणे). शेतकरी घरातला जन्म. आई-वडिलांकडे जमिनीचा एक लहानसा तुकडा होता परंतु ते इतरांच्या शेतात काम करायचे. ज्यांची शेती होती त्यांच्याकडे बोअरवेल होती. आमची जमीन कोरडी पडून आमची वाट पहात राहिली. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा इतर मुलांप्रमाणे मी शेतात काम करण्यास सुरुवात केली. एक दिवस काम करत असताना माझ्या लग्नाची चर्चा सुरू असल्याचं कानावर आलं. तेव्हा मी अंदाजे 14-15 वर्षे वयोगटातील असावी' असं जनाबाई म्हणतात. एका वर्षाच्या आतच मांडीवर मुल खेळायला लागलं. मुलगा झाला म्हणून नवरा खुश झाला. त्यामुळे कोणतीही अडचण नाव्हती. एक दिवस तो घरी आला तेव्हा हातात एक लहान पैशाची बॅग होती. थांबत, म्हणाला - तयारी करा, उद्या आपल्याला निघायचं आहे. कुठे? कशासाठी? विचारलं तर उत्तर वाटेवर सापडले असं म्हणाला. ट्रेनमध्ये आमच्या सारख्या 31 जोड्या असतील. सगळ्या वयोगटातील जोडपी आमच्यासोबत होती. कोणाचं दुध पितं बाळ होतं तर कोणाची मुलं मोठी झालेली होती. ट्रेनमध्ये पुरुष बिडी पित होते तर स्त्रिया मुलांना सांभाळत होत्या. 'आपण उसाची कापणी करण्यासाठी कर्नाटकात जात आहोत. पुरुष ऊस तोडतील आणि स्त्रिया ढीग बनवतील' असं एका महिलेने सांगितलं. 2 ते 3 दिवसांनी जेव्हा ते कर्नाटकला पोहोचले तेव्हा पाहिलं तर चारही बाजूला उसाची शेतं होती. तिथे एका बाजूला आम्ही घर बनवलं. लाकडं आणली आणि त्यांना तोडून झोपडी बनवली. छप्पर म्हणून चटई लावली. दरवाजा म्हणून चादर लावली. खिडक्यांची तर काही गरजच नव्हती. मी जवान होते. गरीबी पाहिले होती पण त्रास नाही पाहिला. अनेक महिने आम्ही याच घरांमध्ये राहिलो. आजुबाजूला 20-25 घरं तयार झाली. जना म्हणाली, गावी असतानासुद्धा दुसऱ्यांच्या शेतात काम केलं. पण हे उसतोडीचं काम अवघड आहे. जोडीनं काम करावं लागतं. नवरा उस तोडणार तर बायका त्याचा ढिग तयार करणार, तो बांधून ट्रकमध्य लोड करायचा. एका-एका वेळी तब्बल 30 किलोपेक्षा जास्त ढिग उचलायला लागायचा. संध्याकाळी अंगाचा जीव निघायचा. कंबर दुखायची. झोप लागली की बरं वाटायचं पण तोच सकाळ व्हायची. की पुन्हा त्याच कामाला सुरुवात. लग्नानंतरची दुसरी दिवाळी आली. आवडीचा सण. पण तो सुद्धा ही काम करण्यात गेला. साधं गोडाचं काही करून खाताही आलं नाही. रात्रीपर्यंत पोट दुखत होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी माझा 'महिना' आला होता. उसाच्या कामात खूप मेहनत आहे. एका वेळी 30 किलो उचलणे आणि त्यांना ट्रकवर लोड करणे. त्यात पीरियड्स आले होते. म्हणून मी त्या दिवशी सुट्टी घेतली. पण हे काम जोड्यांमध्ये होतं, त्यामुळे माझा नवरासुद्धा रिकामा होता. पण मग तो लहान खरेदीसाठी शहरात गेला. बऱ्याच दिवसांनी मला मुलाबरोबर राहण्याची संधी मिळाली. पण तितक्यात कंत्राटदार घरी आला. पडदा बाजुला केला तर तो थेट आत आला आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. घरात कोणी नाही पाहिलं आणि नकार देऊनही माझा हात धरू लागला. माझ्या नवऱ्याने त्याच्याकडून आगाऊ पैसे घेतले होते. मी घाबरून नको म्हणाले पण त्याने मला सगळीकडे हात लावायला सुरुवात केली आणि शिव्या देत राहिला. थोड्या वेळाने तो निघून गेला. बाळ रडत होतं. सगळ्या त्रासामुळे मी पण रडायला लागले. संध्याकाळी नवरा घरी आला. माझ्यासाठी त्याने तेल आणि साबण आणला होता. पण मी त्याला काही सांगितलं नाही. मी हे नवऱ्याला नाही सांगितलं कारण एकट्या असणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत असं होतं. त्या हे सगळं नाही सांगत त्यांच्या नवऱ्याला. नवरा सोडा एकमेकींशीसुद्धा बोलायच्या नाहीत. ऊस तोडण्याच्या कामाला 6 महिने गेले. निघताना कंत्राटदाराने मी ज्या महिन्यात आले नव्हते त्या दिवसांचे पैसे वजा केले. मी एकटी नव्हते. सर्व महिलांचं असंच झालं. परत जाताना लोक कुरकुर करीतच राहिले, जणू 'महिना' ही आमची 'चूक' असावी. पुढच्या वेळीही असंच घडलं. त्याच्या पुढच्या वर्षीही तेच. जेव्हा महिना येईल, तेव्हा थोडं काम होईल, परंतु ऊस लोड करण्याचं काम फारच अवघड आहे. शिडीवर चढण्यासाठी ट्रकवर ढीग लोड करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सुट्टी घेतल्यास 700 रुपये थेट वजा केले जायचे. माझा नवरा म्हणाला - गर्भाशय काढून टाक. झंझट संपेल! खरंतर मलाही यातून सुटायचं होतं कारण कंत्राटदार रोज म्हटलं तरी छेडायचा. त्यातून मुल राहण्याची मला भीती होती. ती संपेल म्हणून मी ऑपरेशनसाठी ठेकेदाराकडून कर्ज घेतलं. गर्भाशय काढून टाकलं. आता मी हवी तेव्हा पूजा करू शकत होते. मी संपूर्ण महिना अखंड घरात फिरत असायचे. स्वयंपाकघरा जायचे. ऊसाची काम करायचे. एकाही सुट्टीशिवाय नोव्हेंबर ते मार्चपर्यंत दररोज काम करायचे. कंत्राटदाराचे कर्ज परतफेड करण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे लागली. पण नंतर मी थकायला लागले आणि नवऱ्याचं वागणंही बदललं होतं. गर्भाशय काढलं तेव्हा 23 वर्षांची होते आता 35 वर्षांची आहे. वाकून चालायला लागले. कामाला जाऊ शकत नव्हते. नवरा चिडला आणि एकदिवस सोडून गेला मला आणि मुलाला. (पीडितेचे नाव गोपनीयता राखण्यासाठी बदलण्यात आले आहे.) (कोऑर्डिनेशन आणि शब्दांकन- मनीषा सीताराम घुले, प्रेसिडेंट- महिला विकास मंच फेडरेशन, बीड)
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Human story, Maharashtra

    पुढील बातम्या