मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात मरण स्वस्त झालंय का? मंत्रालयासमोर वर्षभरात 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, दोघांचा मृत्यू

राज्यात मरण स्वस्त झालंय का? मंत्रालयासमोर वर्षभरात 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, दोघांचा मृत्यू

मुंबई मंत्रालय

मुंबई मंत्रालय

आकडेवारी पाहिल्यावर महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीचा अंदाज येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 30 मार्च : राज्यातील अनेक जणांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात सारखे खेटे घालावे लागत असतात. वाट पाहूनही समस्या सुटत नसल्याचे पाहून अनेक जण मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न करतात. गेल्या काही महिन्यात मंत्रालयासमोरील आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मार्च 2022 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये एकूण किती जणांनी आत्महत्या घेतला, याचा आढावा न्यूज 18 लोकमत डिजिटलने घेतला आहे. आकडेवारी पाहिल्यावर महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीचा अंदाज येत आहे.

तीन दिवसांपूर्वी दोन महिलांसह तिघांनी सोमवारी एकाच दिवशी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या तिघांपैकी धुळे येथील शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला. तर नवी मुंबईतील संगीत डवरे आणि पुण्याचे दिव्यांग रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती आहे.

पहिली घटना -

मृत शीतल गादेकर यांचे वय 63 होते. ही महिला धुळ्यातून मुंबईला आली होती. तिच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात नऊ गुंठ्याचा प्लॉट (नंबर पी-16) आहे. तो 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस खोटी नोटरी बनवून नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावावर केला. तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विनाकायदेशीर खरेदी खतऐवजी 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बोगस सह्या केल्या आणि गादेकर यांचे पती रवींद्र गाडेकर यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करत बोगस व्यक्ती उभा केला. त्याच्या माध्यमातून हा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला, अशी तक्रार शीतल गादेकर यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती.

याबाबतचा वारंवार पाठपुरावाही त्यांनी केला. मात्र, त्याची दखल कुणीही घेतली नाही. त्यामुळे 27 मार्चला मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सरकार दरबारी त्यांची समस्या नसल्याचे पाहून त्यांनी नैराश्येतून कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तर शीतल यांनी मंत्रालयासमोर येण्यापूर्वीच अर्धा-पाऊण तास आधीच कीटकनाशक औषध घेतले असावे, असा निष्कर्ष तपासणीनंतर डॉक्टरांनी काढल्याचे सांगितले. तर शीतल यांचा विष प्राशन केल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला.

दुसरी घटना -

संगीता डवरे या नवी मुंबई येथे राहणाऱ्या महिलेनेही कीटकनाशक पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे जखमी डवरे यांच्यावर डॉक्टरांनी नीट उपचार केले नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार संगीता हिने नोंदवली होती. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने तिने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तिसरी घटना -

रमेश मोहिते या दिव्यांग व्यक्तीनेही मंत्रालयासमोरच्या रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. दिव्यांगानासुद्धा अनुदानात वाढ करून देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करूनही सरकार दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा मोहिते यांचा आरोप आहे. दिव्यांगांवर सरकारकडून होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. रमेश मोहिते हे पुण्याच्या मावळ तालुक्यातील रहिवासी आहेत.

चौथी घटना -

दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मात्र, याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तेथे तैनात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी वेळीत या तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सुरेश मुंडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सुरेश मुंडे हे माजी सैनिक आहेत. बीड पोलीस फसवणूक प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने या माजी सैनिकाने मंत्रालयासमोर आत्महत्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

पाचवी घटना -

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. मात्र, याचवेळी एका तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. पण सुदैवाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीमध्ये हा तरुण अडकल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, रुग्णवाहिकेतून नेले जात असताना त्याला आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण विचारण्यात आले.

यावेळी त्याने धक्कादायक कारण दिले. त्याच्या प्रेयसीवर बलात्कार झाला असून, न्याय मिळाला नसल्याचे कारण त्याने दिले. बापू नारायण मोकाशी असे या तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. मंत्रालयात याआधीही अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. ही घटना मागच्या वर्षी नोव्हेंबर (2022) महिन्यात घडली होती.

सहावी घटना -

मागच्या वर्षी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास धाराशिव येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुभाष देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव होते. त्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना सुभाष यांनी साथ न दिल्याने त्यांचा अखेर मृत्यू झाला होता. सुभाष देशमुख हे धाराशिव जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मागच्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये घडली.

सातवी घटना -

नांदेडमधील राजून चिनाप्पा मुरगुंडे यांनीही मागच्या वर्षी मे महिन्यात अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजून चिनाप्पा मुरगुंडे हे आपल्या मागण्यांसाठी मागील 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. पण त्यांची कोणी दखल घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपण करत असलेले उपोषण कोणी गांभीर्याने घेत नसुन आपली कोणी दखल घेत नाही, म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना मागच्या वर्षी मे 2022 मध्ये घडली होती.

आठवी घटना -

तर याआधी म्हणजे मागच्याच वर्षी मे महिन्यात मंत्रालयात धक्कादायक प्रकार घडला होता. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सायन येथील एसआरए इमारतीतील घराबाबत वाचा फोडण्यासाठी या महिलेने हा आत्महत्येचा प्रयत्न केला. रूपा मोरे असे या महिलेचे होते. तिने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तिला तात्काळ अडविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तिच्यासोबत तिची दोन मुलेही होती. तर यानंतर रूपा मोरे या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

एकंदरीत या सर्व घटना पाहता, मागच्या एक वर्षात मंत्रालयासमोर अनेकांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्चितच योग्य नाही. शासन-प्रशासन या बाबींकडे कशा पद्धतीने बघते, असा विचार सर्वसामान्यांच्या मनात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer, Maharashtra government, Maharashtra News, Maharashtra politics