26 जून : टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबामाऊली-तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा आज बेलवाडीत पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवाडीत मोठ्या उत्साहात पार पडलं.
नेत्रदीपक रिंगणसोहळ्याने लाखो भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करून दिलं.
यानंतर रिंगणात मानाच्या अश्वांचं आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या मानाच्या अश्वांनी डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच गोल रिंगण पूर्ण करून तुकोबारायांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर दुसऱ्या अश्वाने परिक्रमा घातली.या नयनरम्य सोहळ्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.