यवतमाळ, 19 एप्रिल : जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण हा प्रकार आत्महत्येचा नसून ऑनर किलिंगचा असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे वडील, भाऊ आणि जावई या तिघांनी तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
(वाचा-BREAKING! आता 18+ व्यक्तींना मिळणार CORONA VACCINE! PM मोदींचा मोठा निर्णय)
पांढरकवड्याच्या पेंढरी शेत शिवारातील एका विहिरीत रेखा शेडमाके या विवाहित तरुणीचा मृतदेह आढळला होता. तसंच या तरुणीच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीही मिळाली होती. पण शवविच्छेदन अहवालात वेगळाच प्रकार समोर आला. या तरुणीची आधी गळा आवळून हत्या झाली आणि नंतर तिचा मृतदेह विहिरीत ढकलून दिल्याच समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी ऑनर किलिंगच्या अँगलनं कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. पोलिसांनी अवघ्या 72 तासांच या प्रकरणाचा छडा लावला.
(वाचा - दुसऱ्यांदा आढळला विनामास्क, पोलिसांनी ठोठावला थेट 10 हजारांचा दंड)
रेखा हिचा विवाह काही दिवसांपूर्वी राम शेडमाके याच्याबरोबर झाला होता. कुटुंबीयांचा विरोध पत्कारत रेखानं रामबरोबर विवाह केला होता. त्यानंतर काही दिवसांनी रेखा माहेरी म्हणजे पेंढरी इथं आली होती. पण 11 एप्रिल रोजी अचानक रेखाचा मृतदेह एका विहिरीत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्या वाटणारा हा प्रकार ऑनर किलींगचा असल्याचं नंतर पोलिस तपासात स्पष्ट झालं. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनाविरोधात विवाह केल्याने रेखाचे कुटुंबीय नाराज होते. ती माहेरी आली असता 9 एप्रिल रोजी रेखाचे वडील विलास मरापे, रेखाचा भाऊ हिरामण मरापे आणि मरापे यांचा जावई सुभाष यांनी रेखाला पकडून शेतात आणलं. याठिकाणी या तिघांनी दोरीनं गळा आवळून तिची हत्या केली. तसंच एक चिठ्ठी लिहून तिच्या हाताला बांधली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.
हत्येनंतर कुटुंबीयांनी दोन दिवस काही घडलंच नाही असं त्यांनी दाखवलं. पण पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत प्रकरणाचा उलगडा केला. त्यानंतर आरोपींनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी रेखाची हत्या केल्याचं कबूल केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Yavatmal, Yavatmal news