घरात सॅनिटायझर करत असताना उडाला आगीचा भडका, महिलेचा मृत्यू

घरात सॅनिटायझर करत असताना उडाला आगीचा भडका, महिलेचा मृत्यू

रात्री 11 च्या सुमारास घरात सॅनिटायझरची फवारणी केली. त्यामुळे मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्यामुळे घरात आगीचा भडका उडाला.

  • Share this:

नाशिक, 27 जुलै : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही जर घरात सेनिटायझेशन करत असाल तर सावधान. कारण, नाशिकमध्ये वडाळागावात घरात सॅनिटायझेशन करत असताना मेणबत्तीच्या संपर्कात आल्यामुळे आगाची भडका उडाला, यात एक महिला 90 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

ही घटना वडाळागावातील महेबुबनगरमध्ये 20 जुलै रोजी रात्री घडली. रजबीया शेख असं मृत महिलेचं नाव आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वजण आपल्या परीने खबरदारी घेत असतो. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सॅनियझरचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. पण, निकृष्ट दर्जाचे सॅनियझर वापरल्यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

वडाळागावातील महेबुबनगर परिसरात लाईट गेली होती. रजबीया शेख यांनी आपल्या घरात लाईट नसल्यामुळे मेणबत्ती लावली होती. रजबीया शेख यांनी रात्री 11 च्या सुमारास घरात सॅनिटायझरची फवारणी केली. त्यामुळे मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्यामुळे घरात आगीचा भडका उडाला. रजबीया शेख यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरजोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली. त्यांचा पती शाहीद आणि आजुबाजुच्या महिलांनी धाव घेऊन आग विझवली. पण तोपर्यंत रजबीया गंभीर भाजली होती.

त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, 24 जुलैला उपचारादरम्यान रजबीया यांचा मृत्यू झाला. रजबीया ही धुणी-भांडी करून दोन मुलींसह संसाराचा गाडा ओढत होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Published by: sachin Salve
First published: July 27, 2020, 4:02 PM IST

ताज्या बातम्या