कन्हैया खंडेलवाल, (प्रतिनिधी)हिंगोली, 25 मार्च: परदेशातून आलेल्या 10 नागरिकांना होम क्वॉरनटाईन करण्यात आलं आहे. त्यात फिलिपाईन्स येथील-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01, सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकूण 10 नागरिकांचा समावेश आहे. या सर्व नागरिकांना होम क्वॉरंनटाईन (घरात विलगीकरण) करण्यात आले आहे.
होम क्वॉरनटाईनमधील नागरिकांच्या हातावर होम क्वॉरनटाईनचा शिक्का मारुन त्यांना 14 दिवस घरातच थांबण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रॅपिड ॲक्शन टीममार्फत त्यांची दररोज विचारपूस करण्यात येत आहे. या सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची काही लक्षणे आढळल्यास त्यांना रॅपिड ॲक्शन टीममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
हेही वाचा...Good News: दोन रुग्ण पूर्णपणे बरे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन
दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर संशयीत रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, हिंगोली व अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी, वसमत ग्रामीण रुग्णालय, आराखाडा बाळापूर, सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये कुठलाही संशयीत रुग्ण दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
सुरक्षित अंतर ठेवा...
दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोना चा प्रादुर्भाव पाहता हिंगोली प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने अत्यावश्यक सेवांमध्ये सुरू असलेल्या दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर दोन ग्राहकांमध्ये एक मीटर चे पट्टे आखणे अनिवार्य केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा...CORONA चा 'खरा' अर्थ सांगणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्याचं पंतप्रधानांकडून कौतुक
25 मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये किराणा दुकान, औषधी दुकान, भाजीपाला यांचाही समावेश आहे.नागरिक सामान, भाजीपाला, औषधी खरेदी करण्यासाठी दुकानावर एकच गर्दी करत असल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सकाळी शहरातील किराणा दुकान, मेडिकलवर जाऊन कोरोना बाबत खबरदारी घेण्याच्या मार्गदर्शक सूचना केल्या तसेच दुकानासमोर विक्रेत्यांनी स्वतःहून दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राहील या हिशोबाने पट्टे मारून आखणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. दुकानदारांनी येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करणे गरजेचे आहे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे. नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करू नये प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा.. धक्कादायक! फक्त 20 मिनिटात एका माणसामुळे 4 जणांना झाली Coronavirus ची लागण
हिंगोली या ठिकाणी मिळणार भाजीपाला
अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला, किराणा सामान खरेदी करीता लोक दररोज मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे करोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने आज पासून एक दिवस आड सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत किराणा दुकाने व भाजीपाला विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज काढले आहेत. तर हिंगोली शहरामध्ये आठ ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे त्यामध्ये 1) शाहू चौक कोथळज रोड, 2) एमजेपी पाणी टाकी, 3) रिसाला ईदगाह, 4) जलेश्वर मंदिर चिमणी बाजार, 5) पोळा मारुती मंदिर, 6) बनातवाला फंक्शन हॉल, 7) केमिस्ट भवन,8) सिद्धार्थ नगर या ठिकाणांचा समावेश आहे अशी माहिती रामदास पाटील यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.