Home /News /maharashtra /

'त्या' दोघांचे संबंध होते, त्यातून भांडण झालं आणि.. गृहमंत्र्याचे बेजबाबदार वक्तव्य

'त्या' दोघांचे संबंध होते, त्यातून भांडण झालं आणि.. गृहमंत्र्याचे बेजबाबदार वक्तव्य

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झालेल्या प्राध्यापिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली.

सिल्लोड,5 फेब्रुवारी:वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झालेल्या प्राध्यापिका जळीत प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यात घरात घुसून एका महिलेला पेटवण्यात आलं आहे. महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित महिला 95 टक्के भाजली असून पोलिसांनी आरोपी संतोष मोहिते याला अटक केली आहे. हिंगणघाट येथील घटनेची औरंगाबादेत पुनरावृत्ती घडली असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्या दोघांचे संबंध होते, असं मी ऐकलं आहे. त्यातून दोघांच भांडण झालं. यातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे, असे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय आहे प्रकरण? एका बिअर बार चालकाने घरात घुसून महिलेला पेटवलं. महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित महिला 95 टक्के भाजली असून पोलिसांनी आरोपी संतोष मोहिते याला अटक केली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील ही घटना आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय पीडित महिला यामध्ये गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी संतोष मोहिते हा अंधारी येथील राहणारा आहे. त्याला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सोमवारी वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्राध्यापिका जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के होरपळली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. प्राध्यापिका जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीची पत्नी म्हणाली, 'ते असं काही करतील, असं वाटलं नव्हतं. त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता. घटना घडली त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते प्रचंड अस्वस्थ होते. ते सारखे घराबाहेर जात होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होते. सकाळी उठून ते कामाला जातील म्हणून मी त्यांच्यासाठी डबा करून दिला. मात्र, ते काहीही न सांगता घराबाहेर पडले आणि काही वेळातच या घटनेची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.' आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा पीडित प्राध्यापिकेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं. त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागते. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले आहे. पीडितेच्या गावातही स्मशान शांतता.. राज्याला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत प्रकरणी मंगळवारी शहरात तीव्र पडसाद उमटले. नराधमाला जिवंत जाळा, त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जात आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी उत्स्फूर्तपने कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी ठाण्यात घेरावही घातला. तर पीडितेच्या गावातही स्मशान शांतता आहे. एकंदरीत नागरिकांत संताप असला तरी शांततेत बंद पाळण्यात आला आहे. काय आहे घटना? एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Aurangabad crime, Maharashtra crime, Maharashtra news

पुढील बातम्या