अमरावती, 15 जानेवारी : अवघ्या 1 दिवसाची असताना नागपूर स्थानकावर सापडलेली वर्षा आज 23 वर्षांची झाली आहे. इतर मुलींसारखा तिचाही संसार सुरू व्हावा यासाठी वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य मतिमंत मूकबधिर बेवारस बालगृहाचे संस्थापक वडिलांप्रमाणे मुलीच्या लग्नासाठी प्रयत्न करीत होते. तिचं लग्न ठरल्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. आनंदाची बाब म्हणजे तिचे कन्यादान करण्यासाठी खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. शक्य झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे देशमुखांनी सांगितले.
अंबादासपंत वैद्य मतिमंत मूकबधिर बेवारस या बालगृहात वाढलेल्या वर्षाचा तेथेच राहणाऱ्या समीर याच्य़ाशी विवाह ठरला आहे. समीर हा शिर्डी येथे बेवारस सापडला होता. या बालगृहात दोघांचे संगोपन झाले. काल सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुखांनी या बालगृहाला भेट दिली. यावेळी गृहमंत्र्यांनी स्वत: चुलीवर चहा केला आणि बालगृहातील मुलांना दिला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकरही उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्र्यांना वर्षाचे कन्यादान करावे, अशी विनंती केली. यावर गृहमंत्र्यांनी वर्षा-समीरचा विवाह नागपूरला केला जाईल व यावेळी मी कन्यादान करीन असं आश्वासन दिलं. सोमवारी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा-समीरचा साक्षगंध विधी पार पडला. हा क्षण बालगृहातील प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.
18 वर्षानंतर मुलांनी जायचं कुठे?
कायद्यानुसार बालगृहात राहण्यासाठी मुलांना 18 वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र बालगृहात राहणाऱ्या मुलांना ओळखपत्रसारख्या बाबी नसल्याने नोकरी मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी आर्थिक स्वावलंबन येण्यासाठी त्यांना सुरुवातीची बरीच वर्ष खर्च करावी लागतात. मात्र कायद्यानुसार मुलांना 18 वर्षानंतर बालगृहात राहत येत नाही. अशावेळी 18 वर्षानंतर मुलांनी जायचं कुठे ? असा सवाल समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी उपस्थित केला आहे. हा कायदा मुलांसाठी जाचक असून या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पापळकरांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.