महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून हालचाली, गृहमंत्री थेट आंध्रप्रदेशला जाऊन घेणार माहिती

महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून हालचाली, गृहमंत्री थेट आंध्रप्रदेशला जाऊन घेणार माहिती

अनिल देशमुख यांनी सरकार याबाबत कठोर पाऊलं उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : 'महिलांवरील अत्याचारांविषयी राज्यशासन संवेदनशील असून राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदेशने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी मी स्वतः आणि गृहराज्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिनांक 20 फेब्रुवारी रोजी हैद्राबादला जाणार आहोत,' अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

'महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत,' असं म्हणत अनिल देशमुख यांनी सरकार याबाबत कठोर पाऊलं उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत.

'महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलद गतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला 'दिशा' कायदा प्रभावी ठरेल अशी माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हैद्राबादला जाऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहे,' असं अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, या दौऱ्यात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) श्री. सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. शंभूराज देसाई, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला आणि बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे हे सोबत असतील, अशीही माहिती आहे.

First published: February 17, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या