आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला गृहमंत्र्यांचा धक्का, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने?

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला गृहमंत्र्यांचा धक्का, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने?

नाईट लाईफवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 19 जानेवारी : शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य  ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडला आहे. कारण 26 जानेवारीच्या रात्रीपासून नाईट लाईफ सुरु करण्याचा अजून कोणताही निर्णय झालेली नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाईट लाईफवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

'26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरु होणार की नाही याचा निर्णय झालेला नाही. नाईट लाईफ सुरु करण्यासाठी तेवढा पोलीस स्टाफ आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच नाईट लाईफचा निर्णय घेतला जाईल. येत्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होऊन मग निर्णय होणार,' अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे मुंबईतील नाईट लाईफबाबत नक्की काय निर्णय होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू होणार'

मुंबई पोलिसांचं अश्वदल पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मुंबईत पोलिसांकडे याआधी अश्वदल होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता तब्बल 88 वर्षांनी हे युनिट सुरु होणार आहे.

कसं असेल अश्वदल?

मुंबई पोलिसांच्या या अश्वदलामध्ये 30 घोडे असणार आहेत. पेट्रोलिंग, ट्राफिकसाठी या दलाचा वापर केला जाणार आहे. 26 जानेवारीपासून हे युनिट सुरू होणार आहे. बृहन्मुंबई माउंटेड पोलीस युनिट 1 सब इन्सपेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. तसंच जमावावर नियंत्रण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाते. हिंसक जमावावर नियंत्रणासाठी अश्वदल महत्त्वाचं आहे, असं गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिर्डीतील वादाबद्दल काय म्हणाले गृहमंत्री?

'शिर्डी आणि पाथरी बाबत जो वाद निर्माण झाला त्यावरून बंद पुकारला आहे. पाथरी आणि शिर्डी ग्रामस्थांना मुंबईला बोलवून किंवा तिथं जाऊन चर्चा करू. साई मंदिरातील दर्शन सुरू आहे. पोलीस यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. शांततेने आंदोलन सुरू आहे,' असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

CAA वर भाष्य

CAAबाबत कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं होतं. त्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, 'कपिल सिब्बल काय बोलले याची माहिती घेतो, मला कल्पना नाही.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 01:08 PM IST

ताज्या बातम्या