Home /News /maharashtra /

मराठी भाषा वापराबाबत शिवसेना मंत्र्याने लिहिलेल्या पत्राला अमित शहांचं सकारात्मक उत्तर

मराठी भाषा वापराबाबत शिवसेना मंत्र्याने लिहिलेल्या पत्राला अमित शहांचं सकारात्मक उत्तर

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी लिहिलेल्या पत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्राधिकरणांत त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे शहा यांनी पत्राद्वारे कळिवले आहे. राज्यात त्रि-भाषा सूत्राची अमंलबजावणी करण्याबाबत मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी शहा यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 नुसार मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे. केंद्र शासनाने राजभाषा नियम 1967 चे धोरण अंगीकारलेले असून त्याद्वारे राज्याच्या अखत्यारितील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांना त्रि-भाषा सूत्र लागू केलेले आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम व मध्य रेल्वे, टपाल आदी कार्यालयात या सूत्राची अमंलबजावणी होत नसल्याची बाब देसाई यांनी निदर्शनास आणून दिली होती. याबाबत सहा फेब्रुवारी रोजी शहा यांनी पत्र पाठवून त्रि-भाषा सूत्राची अमंलबजावणी करण्याबाबत विनंती केली होती. ठाकरे सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर या पत्राला अमित शहा यांनी 20 फेब्रुवारी रोजी उत्तर कळविले आहे. केंद्राच्या अखत्यारितील प्राधिकरणांत त्रि-भाषा सूत्राची अमंलबजावणी होते किंवा नाही, याची संबंधितांकडून माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी कळविले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत बँका, पश्चिम व मध्य रेल्वे यामध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याच्या अनेक तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झालेल्या असून केंद्राने यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने केंद्रीय कार्यालयांत मराठीचा वापर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, BJP

    पुढील बातम्या