हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 10 मार्च : राज्यभरात रंगाची उधळण करत धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, चंद्रपूरमध्ये होळीला गालबोट लागलं आहे. दिवसभरात वेगवेगवेळ्या घटनांमध्ये 3 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
चंद्रपूरमधील मारडा इथं वर्धा नदीवर धुलीवंदन साजरी करण्यासाठी 4 ते 5 मित्र आंघोळीसाठी गेले होते. धुलीवंदन साजरी केल्यानंतर आंघोळीसाठी सर्व जण नदीत उतरले होते. परंतु, याच गटातील अंकित पिंपळशेंडे (वय 23) हा तरुणाला पाण्याचा अंदाजा आला नाही. काही कळायच्या आत अंकित पाण्यात बुडाला. मित्रांनी आरडाओरडा करून अंकितला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
त्यानंतर या घटनेची माहिती नातेवाईक आणि पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अंकितचा शोध सुरू आहे.
11 वर्षाचा संस्कारच्या मृत्यूने गावावर शोककळा
तर दुसऱ्या घटनेत गावालगतच्या मुरुमाचे खड्ड्यात आंघोळीसाठी गेलेल्या संस्कारचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्वदयद्रावक घटना जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातल्या नांदगाव फुर्डी इथं घडली. या घटनेनं ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली. संस्कार संजय मोगरे (वय 11) याने आज सकाळपासून आनंदात धुलीवंदन साजरी केली. रंग लावल्यावर आंघोळ करायची कुठे यावर गावलगतचा खड्डा हा पर्याय सर्वांनी निवडला.
गावातून रस्ता बांधकाम सुरू आहे. त्याकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदारांने पोकलेन वापरून भला मोठा खड्डा खोदला आहे. त्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पाणी साचलं होतं. खड्डा पाण्याने तुडुंब भरलेला होता. ५ मित्र आंघोळीसाठी त्या खड्ड्याच्या दिशेने निघाले. त्याचा ठिकाणी रस्ता कंत्राटदारांची पोकलेन उभी होती. तिच्यावर त्यांनी खेळ खेळत पाण्यात उडी मारली. इतर सर्वच पाण्याबाहेर आले. मात्र, संस्कार बाहेर आलाच नाही.
मित्रांनी खूप आरडाओरडा केला मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. मुलांनी गावात धाव घेतली आणि गावात येऊन घडलेला प्रकार सांगताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नेण्यात आला. या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली असून सणाच्या दिवशी झालेल्या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पाण्याचा अंदाजा न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू
तर तिसरी घटना ही आज संध्याकाळी घडली. रंगोत्सवाचा गुलाल उधळून नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अखिल कामीडवार (वय 27) असं मृतकाचे नाव आहे. पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील रहिवासी असलेला हा युवक आज धुळवड साजरी करुन काही मित्रांसह अंधारी नदीपात्रात आंघोळीला गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. धुळीवंदनाच्या दिवशी 3 जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.