कन्हैया खंडेलवाल, हिंगोली, 7 जून : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या ईसापूर धरण क्षेत्रातील मोरगव्हाण जवळ ईसापूर धरणात तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली येथील 5 मुले ईसापूर धरण कालवा क्षेत्रातील मोरगव्हान परिसरात पोहण्यासाठी गेली होती. या 5 जणांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर पोहायला येत असल्याने दोन जण थोडक्यात बचावले आहेत.
योगेश गडाप्पा, शिवम चोंडेकर, रोहित चित्तेवार अशी तीन मयत मुलांची नावे असून घटनास्थळी परिसरातून नागरिक शमशेर अली खा पठाण, कांता पाटील, आपा कदम, यांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी कळमनुरी येथील रुग्णालयात आणण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून याचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्राला विविध भागात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या
गोंदिया - 7 जून
गोंदियामध्ये दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. वैनगंगा नदीपात्रात पोहोण्यासाठी हे दोघे मित्र गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बदलत्या हवामानामुळे आणि चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्व नदीपात्र भरली आहेत. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
परभणी - 1 जून
जिंतूर तालुक्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील वझर गावामध्ये आज सकाळी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. वझर गावाच्या सीमेवर असलेल्या धरणांमध्ये गावात राहणाऱ्या 18 वर्षीय ओम पजई आणि 16 वर्षीय महेश पजई हे दोन युवक सकाळी पोहण्यासाठी गेले होते. परंतु अचानक हे दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यातच त्यांचा अंत झाला.
पुणे - 22 मे
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या कोलदरे येथील रहिवासी व मुंबईतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी आलेले उल्हास हिरामण काळे (वय 42 वर्षे) व रोहन राजेंद्र काळे (वय 18 वर्षे) या चुलत्या-पुतण्याचा घोड नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.