हिंगणघाट : साश्रू नयनांनी पीडितेवर अंत्यसंस्कार, महाराष्ट्र हळहळला

हिंगणघाट : साश्रू नयनांनी पीडितेवर अंत्यसंस्कार, महाराष्ट्र हळहळला

शोकाकुल जमावाच्या उपस्थितीत पीडितेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Share this:

दारोडा, 10 फेब्रुवारी : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. दारोडा गावातील एका 24 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. शोकाकुल जमावाच्या उपस्थितीत पीडितेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येईल, असं लेखी आश्वासन वर्धा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नातेवाईक पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. तसंच आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणीही गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे. यासाठी आज दारोडा गावातील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड चीड पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडल्या.

जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला आहे. येथील नागरिक प्रचंड संतापले असून ते न्यायाची मागणी करीत आहेत. नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या घटनेचा लोकांमध्ये राग आहे. 24 वर्षाच्या या पीडित तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नराधमाला तातडीने शिक्षा द्यावी, अशा घोषणा दिल्या जात आहे. गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी लढत होती. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिचा लढा संपला. तिच्या कुटुंबीयांसाठी हे दु:ख पचवणं अवघड जात आहे. काही वेळापूर्वी हिंगणघाटमध्ये मृत पीडितांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन छेडलं होतं. लेखी स्वरुपात आश्वासन द्या, अशी मागणी सरकारकडे केली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी स्थानिकांकडून केली गेली.

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नराधमाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर होती. हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. ह्रदय, यकृत, मूत्रपिंड सर्वच अवयव निकामी झाल्याने पीडितेचा मृत्यू ओढवला. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलखीची असल्याने या पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकारने घेतला होता. पीडितेसाठी रुग्णालयात स्पेशल कक्ष तयार करण्यात आला होता व त्या ठिकाणी दोन डॉक्टर व 7 नर्सेसची 24 तास नेमणूक करण्यात आली होती. पीडितेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून  शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तिची झुंज अखेर संपली.

First published: February 10, 2020, 1:31 PM IST
Tags: hinganghat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading