अमरावतीत हायहोल्टेज ड्रामा, पतीचे कारागृहाच्या आत तर नवनीत राणांचे बाहेर आंदोलन

अमरावतीत हायहोल्टेज ड्रामा, पतीचे कारागृहाच्या आत तर नवनीत राणांचे बाहेर आंदोलन

आमदार रवी राणा यांनी जामीन नाकारल्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

  • Share this:

अमरावती, 14 नोव्हेंबर : ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीमध्ये (Amravati)खासदार पत्नी आणि आमदार पतीच्या आंदोलन चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे कारागृहाबाहेर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी धरणे आंदोलन करत आहे.

आमदार रवी राणा यांनी जामीन नाकारल्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांसह अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आज दुपारी नवनीत राणा यांनी पती रवी राणा यांना सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्याने खासदार नवनीत राणा यांचे कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

'जोपर्यंत आमदार रवी राणा यांची भेट होणार नाही. तोपर्यंत कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू राहणार' असा पवित्रा नवनीत राणा यांनी घेतला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो' असं फडणवीस म्हणाले आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी  व लॉकडाउन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी  रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

रवी राणांचे कारागृहात अन्नत्याग आंदोलन

अटक केल्यानंतर शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20  शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय सुरू ठेवण्यात आले.  या सर्व आंदोलनकर्त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहातच आता राणा आणि त्यांच्या सर्व आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Published by: sachin Salve
First published: November 14, 2020, 2:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या