बीड, 28 सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) काही जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळदार पावसामुळे नद्या- नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थितीमुळे अनेक नागरिक अडकून (Many people stuck in flood) पडले आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाकडून तात्काळ मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून बचावकार्य सुरू झालं आहे.
बीड जिल्ह्यात 10 जण अडकले
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतात पाणी घुसून दहा लोक शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर अडकले आहेत. या नागरिकांना वाचण्यासाठी बीड येथून रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे अर्धे आपेगाव पाण्यात आहे. शेतात असलेल्या बालाजी बाजीराव तट, दत्ता काळदाते, मनोज काळदाते यांच्या शेतात काम करणारे सालगडीव त्यांचे कुटुंब पाण्यात अडकले आहे. या तिघांच्याही शेतातील सालगडी आणि त्यांचे कुटुंब बालाजी तट यांच्या शेतात असलेल्या घराच्या स्लॅपवर बसले आहेत. आजूबाजूला चारही बाजूने पाणी वाढत आहे. या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम आपेगावच्या जवळ दाखल झाली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उस्मानाबादेत 27 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकडी गावात 17 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. तर सौदना गावात 10 जण अडकले आहेत. मांजरा धरणाचे अचानक पाणी आल्याने हे नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
औरंगाबादेत टपऱ्या गेल्या वाहून
औरंगाबादमधील बाबरा गावात मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी नदीपात्राच्या बाहेर आले. पाण्याचा वेग इतका जोरदार होता की, या परिसरात असलेल्या काही टपऱ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
औरंगाबादमध्ये गावात मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी नदीपात्राच्या बाहेर आले pic.twitter.com/TlrNJh2ZOp
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2021
Cyclone Gulab: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
बुलडाण्यात दोघे गेले वाहून
बुलडाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी येथे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून संततधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. राहुल चौधरी आणि भगवान गोरे असे बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत. नाल्याच्या 100 मीटर अंतरावर त्यांची दुचाकी आढळल्याने हे दोघे जण वाहून गेले असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
लातूरमध्ये दुकानांत शिरले पाणी
लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी गावाला लागून तेरणा नदी वाहते दरवर्षी या नदीला पाण्याची टंचाई असते. पण काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने तेरणा नदीचं पाणी उजनी गावातील बाजारपेठेत शिरले असून या बाजारपेठेत असलेले हॉटेल्स, सलून, कृषी साहित्य विक्रीची दुकान पानटपरी आदी सरासरी 20 ते 25 दुकानात पाणी शिरले आहे. या दुकानातील साहित्य पुराच्या पाण्यात भिजवून नुकसान झाले आहे. सरासरी गावाच्या मुख्य बाजारपेठेचा 50 टक्क्यांपर्यंत भाग हा पुराच्या पाण्यात बुडाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, महाराष्ट्र