नाशिकमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी... गोदावरी एक्स्प्रेस रखडली तर अनेक गाड्या रद्द

नाशिकमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी... गोदावरी एक्स्प्रेस रखडली तर अनेक गाड्या रद्द

नाशिक, इगतपुरी ,सिन्नर, त्रंबकेश्वर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांना ही बसला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग (प्रतिनिधी),

नाशिक, 25 सप्टेंबर: नाशिक, इगतपुरी ,सिन्नर, त्रंबकेश्वर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका मुंबईवरून येणाऱ्या चाकरमान्यांना ही बसला आहे. अस्वली, पाडली आणि घोटी स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने लोकमान्य टिळक टर्मिनस- मनमाड गोदावरी एक्स्प्रेस घोटीस्टेशनवर रखडली आहे. एक तासापासून गोदावरी एक्स्प्रेस उभी असल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. नागपूरहून येणाऱ्या गाड्या चाळीसगाव, नाशिक, इगतपुरीला थांबवण्यात आल्या आहेत तर मुंबईकडून जाणाऱ्या गाड्या ठाणे, कल्याणजवळ खोळंबल्या आहेत. पावसाचा जोर आणखी वाढल्याने मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यात जोरदार सुरू असलेल्या पावसाने रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडी येथे रस्त्यावर आणि अस्वली रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी आले आहे. मुंबईवरून नाशिकला येणाऱ्या सर्व गाड्या घोटी, इगतपुरी रेल्वेस्टेशनवर थांबविण्यात आल्याने नाशिकच्या चाकरमान्यांना गाडीतच मुक्काम करावा लागणार असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. पाऊस कधी कमी होईल आणि रस्ता आणी रेल्वे वाहतुक सेवा कधी सुरळीत होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.

रद्द झालेल्या गाड्या..

इगतपुरी-मनमाड पॅसेंजर

मनमाड- पुणे पॅसेंजर

भुसावळ- पुणे एक्सप्रेस

मनमाड- इगतपुरी पॅसेंजर

मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस

पुणे- भुसावळ एक्स्प्रेस इगतपुरीपर्यंत नंतर रद्द

नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस देवळालीपर्यंत जाणार पुढे रद्द

मुंबई- गोरखपूर एक्सप्रेस कल्याण-पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्याला परतीचा पावसाने झोडपलं..

मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पावसाने गोदावरी नदीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे.

शहरातील अहिल्याबाई होळकर पुलाखालून पाणी वेगाने वाहत आहे. पात्रातील लहान मंदिरे पाण्याखाली जाण्यात सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा जिल्ह्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने जनजीवन तर विस्कळीत केलंच आणि द्राक्ष बागायतीलाही फटका दिला आहे. आकाशात जमलेले काळे ढग आणि हवामान खात्याने दिलेला इशारा यामुळे पाऊस सुरूच राहणार असल्याची चिन्हे दिसत आहे. पावसाची संततधार कायम असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. धरणातून प्रति सेकंद 1200 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

VIDEO:उदयनराजेंही तुमच्या मिशीला घाबरतात, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या