कोल्हापूर, 6 सप्टेंबर : महाराष्ट्रासह दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये येत्या दहा तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला होता. मात्र रविवारी संध्याकाळी सहानंतर केरळ, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली असून रविवारी रात्री राज्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड आजरा आणि गगनबावडा भागात मुसळधार पाऊस झाला असून आठवड्यानंतर आलेल्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भात पिकासाठी आणि ऊस पिकासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी दिवसभर कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन शहरांसह जिल्ह्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता.रविवारी रात्री काही भागांमध्ये पाऊस झाल्याने हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला आहे.
पुण्यावर दहा ते पंधरा किलोमीटरचे दाट ढग दाटल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहर आणि ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.
दरम्यान, 10 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह उत्तराखंड तामिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.