नवी दिल्ली 8 जून : जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी उन्हारा पारा कमी झालेला नाही. भाजून काढणाऱ्या उन्हाने राज्य होरपळून निघतंय. महाराष्ट्रात विदर्भात सगळ्यात जास्त उष्मा असून जगातल्या सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. ही उष्णतेची लाट आणखी तीन दिवस अशीच राहणार असल्याचा इशार हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भासोबतच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. प्रचंड उष्मा आणि उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होतेय. सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या आगमनाची. केरळमध्ये थोड्या उशीराने मान्सून शनिवारी दाखल झाला. त्यानंतर तो देशभर पसरणार आहे तोपर्यं सगळ्यांनाच वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या चार दशकांमध्ये यावर्षी सर्वात जास्त उष्मा होता. तीव्र उन्हाळा आणि पाणीटंचाईमुळे राज्यातल्या अनेक भागत लोकांनी स्थलांतरही केलं होतं. मुंबईतही उकाड्याने आणि घामांच्या धारांनी मुंबईकर हैराण झालाय.
India Met. Department: Heat wave to severe heat wave conditions very likely to prevail over Rajasthan, Madhya Pradesh and Vidarbha during next three days.
— ANI (@ANI) June 8, 2019
मान्सून केरळमध्ये दाखल
सर्वांसाठी खुशखबर! कारण, आतुरतेनं वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं याची घोषणा केली आहे. हळूहळू हा मान्सून पुढे सरकेल अशी माहिती देखील यावेळी हवामान विभागानं दिली आहे. 10 जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. पण, दोन दिवस अगोदरच मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे. पण, आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानं आता दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज यावेळी हवामान तज्ञ्ज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, कोकणात देखील मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून दाखल होईल अशी माहिती साबळे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. सकाळी वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं घरावरचं छप्पर देखील उडालं.