मुंबई 29 मे : प्रखर उन्हामुळे सर्व राज्य भाजून निघतेय. घामांच्या धारांनी सगळ्यांनाच त्रस्त केलंय. मे महिना संपत आला असला तरी अजुनही उन्हाची तीव्रता कमी होण्याची शक्यता नाही. पुढच्या पाच दिवस कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. तापमान जास्त राहणार असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के.सी. होसाळीकर यांनी केलंय.
नागपूरात 10 जणांचा बळी
नागपुरातलं तापमान आता पन्नाशी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शहरातील तापमानाचा पारा आता 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. नागपुरात गेल्या 48 तासांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दहाही जणांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्युमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहेत.
विदर्भात सगळ्यात जास्त तापमान
मे महिना संपत आला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दररोज तापमान वाढतच आहे. नागपूरात मंगळवारचं तापमान तब्बल 47.5 डिग्री सेल्सिअसवर गेलं. गेल्या 20 वर्षातलं हे सर्वात जास्त तापमान आहे. यापुर्वी सर्वात जास्त 47.9 डिग्री एवढं तापमान नोंदविलं गेलं होतं. ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेस मुळे तापमान वाढत आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
विदर्भात उन्हाळ्यात तापमान जास्तच असते. दरवर्षी त्यात वाढ होतेय. सकाळी 8 पासूनच उन्हाचा कडाका जाणवायला लागतो. रात्री 12 नंतरही हवेत उष्णता कायम राहते. पहाटे पहाटे वातावरण थोडं थंड होतं मात्र सूर्योदय होताच वातावरण तापायला लगातं. वातावरण एवढं गरम असतं की एसीही काम करत नाहीत. शहरात उष्माघाताचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
राज्यात पाडणार कृत्रिम पाऊस
राज्यात पाऊस उशीरा येणार असल्याचं हवामान खात्याने सांगितल्याने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत टेंडर काढलं जाईल त्यानंतर काम दिलं जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. या प्रयोगासाठी 30 कोटी खर्च अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. धरण क्षेत्रात पाऊस पडण्याचा अधिक प्रयत्न केला जाणार आहे. मराठवाडा - विदर्भ भागातील अवर्षणग्रस्त भागातही हे प्रयोग केले जातील. सोलापूरमध्ये एक रडार याआधीच उभारण्यात आले आहे त्याचीही मदत होईल अशी माहितीही त्यांनी दिली.