कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्र्यांनी केल्या आणखी 5 मोठ्या घोषणा

कोरोनाला हरवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, आरोग्यमंत्र्यांनी केल्या आणखी 5 मोठ्या घोषणा

पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : जगभरातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत असलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात थैमान घालू नये, यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. अनेक शहरांमध्ये विविध व्यवसाय बंद ठेवण्यापासून ते कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडून वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

'राज्यभरात आतापर्यंत 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सर्वांची परिस्थिति स्थिर आहे. गर्दी टाळण्यासाठी एपिडेमिक कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र खासगी लॅबना अजून कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नायडू रूग्णालयात 100 तर वाय.सी.एम. रूग्णालयात 60 बेड्स सुरू करण्यात आले आहेत. तर वर्क फ्रॉम होमची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे,' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?

1. कोरोनाव्हायरच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात सुरू होणार 8 नव्या लॅब. उद्यापासूनच 4 नव्या लॅब सुरू होणार हाफकिन्समध्येही होणार कोरोनाव्हायरसची चाचणी

2. राज्यातली क्वारन्टाइनसाठीचे बेड वाढवले.

3. आयसोलेशन वॉर्ड वाढवले.

4. पुण्यातील 8 खासगी रुग्णालयांना विलगीकरण्यासाठी परवानगी

5. लवकरच केंद्राकडून कोरोनाव्हायरससंदर्भातल्या 10,000 किट मिळणार

दरम्यान, राज्यात आज आणखी एका करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 42 झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित 32 वर्षीय महिला नेदरलँड वरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:-

पिंपरी चिंचवड मनपा - 10

पुणे मनपा - 8

मुंबई - 7

नागपूर - 4

यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी 3, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी 1 असे एकूण 42 रूग्ण झाले आहेत.

राज्यात 58 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1227 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 958 जणांना भरती करण्यात आले होतं. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 865 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 1227 प्रवाशांपैकी 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

पुण्यात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यातील कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे कारण पुण्यात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.  एका महिला रुग्णाला कोरोना झाला असल्याची माहिती पुण्याचे जिल्हा दंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात एकूण 18 तर महाराष्ट्रात 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना झालेल्या रुग्ण महिलेचा फ्रान्स आणि नेदरलँड असा प्रवासाचा इतिहास आहे. गेल्या काही दिवसांत त्रास सुरू झाल्याने 15 तारखेलाा चाचण्या केल्या असता त्या पॉझिटिव्ह आल्या. रुग्णावर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

First published: March 18, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या