Home /News /maharashtra /

'आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता'

'आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता'

बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

    बुलडाणा,10 ऑगस्ट : कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्ष सुनीता शिंदे, बुलडाणा कृ.उ.बा.स. सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, मो. सज्जाद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगाव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच याकामी टाटा समूहाने केलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून तेही लवकरच पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. त्याचबरोबर या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणीही मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रूग्णालयात उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समूहाला उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या