औरंगाबाद, 27 जानेवारी: काल औरंगाबादच्या एका महिलेसाठी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन ठरला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या 65 वर्षीय हसीना बेगम काल भारतात परत आल्या आहेत. 18 वर्षांपूर्वी त्या पाकिस्तानात आपल्या नवऱ्याच्या कुटुंबीयांना त्या भेटायला गेल्या होत्या. पाकिस्तानात गेलं असता तिथे त्यांचं पासपोर्ट हरवलं. त्यामुळे त्यांना पाकिस्तानातील लाहोरच्या तुरुंगात तब्बल 18 वर्षे घालवावी लागली.
औरंगाबाद पोलिसांनी हसीना बेगम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली होती, त्यामुळे त्या आता भारतात परतू शकल्या आहेत. भारतात आल्यानंतर हसीना बेगम यांनी म्हटलं की, 'मी खूप साऱ्या अडचणींचा सामना केला आहे. त्यानंतर आता भारतात आल्यानंतर मला शांतीचा अनुभव होत आहे. मला आता स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे. मला पाकिस्तानात जबरदस्तीने कैद करण्यात आलं होतं.' यावेळी त्यांनी तक्रार दाखल करणाऱ्या औरंगाबाद पोलिसांचं देखील आभार मानलं आहे.
(हे वाचा-दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा थेट आरोप)
पाकिस्तानी न्यायालयाने मागितली माफी
पाकिस्तानात कैद असलेल्या हसीना बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांनीही औरंगाबाद पोलिसांचं आभार व्यक्त केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस स्टेशन परिसरातील रशीदपूर येथे राहणाऱ्या बेगमचं लग्न उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे राहणाऱ्या दिलशाद अहमद यांच्याशी झालं होतं.
(हे वाचा-'मै टकलू हो जाऊंगा' चिमुकल्याचा केस कापतानाचा क्यूट व्हिडीओ पुन्हा VIRAL)
बेगम यांनी पाकिस्तानमधील न्यायालयाला विनंती केली होती की, त्या निर्दोष आहेत. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी माहिती मागितली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी सांगितलं की, औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस स्टेशन परिसरात हसीना बेगम यांच्या नावावर एका घराची नोंदणी आहे. याची माहिती त्यांनी पाकिस्तानी न्यायालयाला पाठवली. त्यानंतर पाकिस्तानने गेल्या आठवड्यात हसीना बेगम यांची सुटका केली आहे. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होतं.