कोल्हापूर, 20 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदरांसह बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडत सत्ता स्थापण केली. यानंतर काल उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का देत 12 खासदार बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार ही शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाल पूर्ण कलाटणी मिळाली आहे. खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या बंडाने कोल्हापूरमध्ये पुढचा खासदार कोण यावर चर्चा रंगली आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलीक यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांच्यानावाची चर्चा जोरदार रंगली आहे. (Hasan Mushrif vs Sanjay Mandlik)
2019 च्या निवडणूकीत संजय मंडलीक शिवसेनेतून खासदार झाले त्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिल्याने त्यांची निवडणूक अत्यंत सोपी गेली होती. परंतु संजय मंडलीक शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे पूर्ण बदलली आहे. जिल्हा बँक, गोकुळ, बाजारसमित्या, महानगरपालिकेत मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची आघाडी आहे. या आघाडीत खासदार मंडलीकही होते त्यामुळे खासदार मंडलीक या सगळ्यापासून दूर गेल्याने 2024 चा खासदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे.
हे ही वाचा : 'भावना गवळींना महाराष्ट्र सरकारकडून क्लीन चीट नाही', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलीक यांच्यात मागच्या कित्येक वर्षांपासून वितुष्ट आहे. परंतु मागच्या दोन वर्षांत त्यांच्यातील वाद थोड कमी होत ते एका विचारमंच्यावर येत होते परंतु 2024 लोकसभेची लढतच या दोघांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्याला परिचीत असलेला मंडलीक मुश्रीफ वाद पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी 2019 साली संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेसाठी गुपीत मदत करत खासदार केले. त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या मंडलीकांनी 2019 साली धनंजय महाडिकांना पाडले तेच महाडिक मंडलीकांचे प्रचाराचे प्रचार प्रमुख असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : राज्यातील काही भागात पावसाची सुट्टी पण, विदर्भ, मुंबई पुण्यात पावसाचा अंदाज वेगळा
मंडलिक हे शिंदे गटात गेल्याने दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. कारण महाडिक राज्यसभेचे खासदार झाल्याने या पक्षालाही ताकदीचा उमेदवार हवाच होता. तो आता मिळाला आहे. पण मंडलिकांना शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्यात येईल. मुश्रीफांचे नाव त्यामध्ये आघाडीवर असेल. जागा राष्ट्रवादी पक्षाकडे असल्याने संभाजीराजे, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील अशी नावे चर्चेत येतील आणि शेवटी मुश्रीफांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल अशी शक्यता आहे. तसे झाल्यास मंडलिक आणि मुश्रीफ अशी अटीतटीची कुस्ती जिल्ह्यात पहायला मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, NCP, Sanjay mandlik