मुंबई, 2 फेब्रुवारी : 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या घोषवाक्यामुळे गावागावात गल्ली-बोळात पोहोचलेला पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. वेळप्रसंगी वडापाव खाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणूनही शिवसेनेने लोकमान्यता मिळवली. पण आता याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात आयफोन दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
ठाकरेंच्या शिवसेनेला नेमकी कशाची भीती आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण म्हणजे उद्धव ठाकरेंकडून नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. तसंच ठाकरेंकडून नेत्यांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
2019 साली महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षांमधल्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचा आरोप करण्यात आला. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे, त्या अनुशंगाने त्यांनी पक्षातल्या मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार-खासदारांसह त्यांचे पीए आणि सर्व स्टाफला आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात पसरली आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
'आयफोन कुणाला परवडत नाही, कारण 60 हजारांपासून रेंज सुरू होते ती लाख-दोन लाखांपर्यंत जाते. कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील, परंतू मी शिवसेनेमध्ये वडापाव खाणारे कार्यकर्ते बघून आलो,' असं दीपक केसरकर म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयफोन वापरण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचं दानवे म्हणाले. पण व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने सुरक्षिततेसाठी प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे, असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.
आयफोन का आहे खास?
फेसटाईम नावाचं फिचर आयफोनला स्पेशल बनवतं. गुप्तचर यंत्रणांना फेसटाईममुळे आयफोन टॅप करता येत नाही. तसंच आयफोनवरून केलेला कॉल रेकॉर्डही करता येत नाही. यासह अनेक स्पेशल फिचर्समुळे आयफोन सुरक्षित समजला जातो.
खरंतर शिवसेनेची सुरूवातच सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून झाली, त्यामुळे आजही शिवसेनेमध्ये सर्वसामान्य तरुण, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक यांचा ओढा जास्त दिसतो, पण याच शिवसेनेत आता खरंच आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकांना 50 हजारांपासून सुरू होणारा आयफोन कसा परवडेल? हादेखील प्रश्नच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena, Uddhav Thackeray