पेण, 6 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची तसंच पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात यावरून वाद आहेत, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून धनुष्यबाणावरचा दावा सोडण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, याला कारण ठरलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी केलेलं विधान. पेणचा पुढचा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल आणि तो मशाल चिन्हावर निवडणूक लढेल, असं अनंत गीते म्हणाले आहेत.
एकीकडे शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नेते मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळणार नाही, मशाल हेच चिन्ह कायम राहणार, याबाबत ठाकरे गटाने मन बनवून घेतलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनंत गीते यांनी हे विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदारांना घेऊन ठाकरेंविरोधात बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरही दावा केला, ज्यामुळे ही लढाई सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात पोहोचली. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि ठाकरे तसंच शिंदे गटाला वेगळं नाव आणि पक्ष चिन्ह दिलं.
निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shivsena