नितीन नांदुरकर, जळगाव 26 मार्च : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील आपल्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. यासोबतच पोलिसांबाबतही त्यांनी वक्तव्य केलं. जे पोलीस आधी मला पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
'ते कायदेतज्ज्ञ..' राहुल गांधींवरील कारवाई चुकीची म्हणणाऱ्या बच्चू कडूंना भाजप नेत्याने सुनावलं
गुलाबराव पाटील म्हणाले, की '1990/92 मध्ये गणपती यायचे तेव्हा पोलीस मला पकडण्यासाठी माझ्या मागे असायचे. गणपती, दुर्गा पूजा, शिवजयंती असे सण आले की पोलीस मला पकडण्यासाठी मागे असायचे. पण आता बरं वाटतं, पोलिसांची एक गाडी मागे एक गाडी पुढे असते, काय रुबाब आहे ना! माणसाचे दिवस कसे बदलतात
पवारांवर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, की ते पवार आहेत ना, कलाकार आहेत. पवार म्हणजे चावी आहेत, ती चावी कुठेही चालते. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या चिंचपुरे गावात विविध विकास कामांचं उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, की विरोधकांकडे एकच भांडवल आहे. ते म्हणजे जात. जेव्हा सर्व पर्याय संपतात तेव्हा माणूस जातीचा वापर करतो, जेव्हा पर्यायच नसतो तेव्हा जात वापरली जाते. ते पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटलाने कधीही जातीचा विचार केला नाही, माझी जात तुम्ही आहात. मी काम केलं नाही तर तुम्ही मला कसं निवडून देणार, म्हणून मी माळी आहे, कोळी आहे, तेली आहे, मराठा आहे...मी सर्वच जातीचा आहे. माझ्या अंगात जात येऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Sharad Pawar