नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव,०७ जुलै : शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत (shinde government) सरकार स्थापन केले आहे.पण अजूनही शिंदे गट आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. आज जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.
'आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
दीपक केसरकरांची राऊतांवर टीका
दरम्यान, 'उद्धव ठाकरे साहेबांनी (uddhav thackery) आम्हाला बोलावले तर आम्हालाही आनंद होईल. पण आता आम्ही एकटे नाही. आम्ही आता भाजप बरोबर आहोत त्यामुळे त्यांच्याशीही संवाद साधावा लागेल. आम्ही संवाद साधत असताना आम्हाला थेट साहेबांशी बोलायचे आहे. मधले आजुबाजूचे लोक बाहेर ठेवून संवाद साधावा ही अपेक्षा आहे'असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी शिवसेनेसोबत चर्चेची अपेक्षाच बोलून दाखवली आहे.
'ते खूप जवळचे समजतात स्वत:ला पण ते खूप जवळचे असतील शरद पवार यांच्या आहे. आम्ही पहिल्या दिवसांपासून साहेबांचे मन वळविण्याचे प्रयत्न करत होतो. राऊत यांच्या पायावर लोटांगण घालणाऱ्यातला मी नाही. साहेबांनी सुद्धा सांगावे मी कधी मंत्रिपदासाठी मी त्यांना म्हटलं आहे, असं म्हणत केसरकर यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.