'फिरत्या चाकावरती देसी घराला आधार', 95 वर्षीय आजीच्या जिद्दीची कहाणी

'फिरत्या चाकावरती देसी घराला आधार', 95 वर्षीय आजीच्या जिद्दीची कहाणी

काही माणसं ही आव्हानांना पुरून उरत आपला संघर्ष सुरू ठेवत असतात

  • Share this:

स्वप्नील घाग, गुहागर, 5 जानेवारी : काही माणसं ही आव्हानांना पुरून उरत आपला संघर्ष सुरू ठेवत असतात. गुहागरमधील पालपणे गावात राहणाऱ्या रुक्मिणी नांदगावकर यांचीही गोष्ट अशीच काहीशी आहे. पालपणे गावात राहणाऱ्या 95 वर्षीय रुक्मिणी नांदगावकर या गेल्या 60 वर्षांहून अधिक काळापासून कुंभारकाम करत आहेत. पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर मातीला आकार देत अनेक प्रकारची मातीची भांडी बनवत आणि त्यातून येणाऱ्या पैश्यातून त्यांच्या संसाराचं चाक त्या आजही पुढे हाकत आहेत. गेल्या 60 वर्षापासून आजीचा हा व्यवसाय अखंडितपणे सुरू आहे.

जन्माला आल्यावर लागणाऱ्या पणतीपासून ते मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जणाऱ्या मडक्यापर्यंतच्या सर्व वस्तू आजी आजही तेवढ्याच आकर्षक आणि मजबूत बनवतात. आजीची ख्याती तालुक्यात एवढी पसरली आहे की, लग्नासाठी लागणारे करे, उन्हाळ्यात पाणी थंड करण्यासाठी वापरलं जाणारं मडकं, नारळाची माडी काढण्यासाठी लागणारी मडकी, देवाची धुपारत, जेवणाची भोगवणे त्याचप्रमाणे मच्छिमार समाजाच्या लग्नात लागणारी भांडी ज्याला आरा बोंडला असं म्हटलं जातं, या सर्व प्रकारची भांडी आजी स्वतः बनवतात. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत किंमत असल्यामुळे आजीच्या भांड्यांना गावागावातून चांगली मागणी आहे.

कच्चा माल तयार करण्यापासून ते अगदी मडकी भट्टीत भाजून काढेपर्यंतची सर्व कामं आजी स्वत: करत आहेत. गावी असलेला तिचा मुलगा अपंग असल्यामुळे त्याला या कामात मदत करता येत नाही,मात्र त्याची पत्नी आजीला जमेल तेवढा हातभार लावून त्यांना जमेल तेवढा दिलासा द्यायचा प्रयत्न करत आहे. गेली 15 वर्ष या आजीची सुनबाई कुंभार कामात आजीला हातभार लावत आहेत. आजीचं काम शिकण्याचा त्या प्रयत्न करत आहेत

आजींची जगण्याची ही जिद्द पाहून गावातले तरुण देखील अवाक होतात. आजींच्या जिद्दीतून त्यांना सकारात्मक ऊर्जा देखील मिळत आहे. काळ बदलत चालला असल्यामुळे जग आधुनिक बनत चाललं आहे. पूर्वीच्या मातीच्या भांड्यांची जागा प्लास्टिक आणि मेटलने घेतल्यामुळे पारंपरिक असलेला कुंभार व्यवसायदेखील आर्थिक उलाढाल होत नसल्यामुळे जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

मात्र 95 वर्षाच्या रुक्मिणी नांदगावकर आज लोप पावत चाललेला कुंभार व्यासाय त्याच दमाने जोपासत आहेत. त्यातून त्यांचं दैनंदिन जीवन जगत आहेत. आजींची ही जिद्द हिंमत हरून व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारी तर आहेच, शिवाय जगण्याची नवी प्रेरणा देखील देणारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2020 11:05 AM IST

ताज्या बातम्या