वर्धा, 27 फेब्रुवारी : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) पहिल्या टप्प्यात अतिशय संयम आणि शिस्तीचे पालन करत कोरोना रुग्ण वाढीचा दर जिल्ह्यात आटोक्यात ठेवला होता. मात्र आता जिल्ह्यातील परिस्थिती बदलली असून नागरिकांनी नियम न पाळल्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री सुनील केदार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
यापुढे मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे आणि दुकानात किंवा उद्योगाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था न करणे, हॉटस्पॉट मधील बाहेर फिरणारे नागरिक अशा सर्वांवर अतिशय कडक कारवाई सोबतच आस्थापना सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसंच निर्बंध असताना नियमांचं पालन न केल्यास गाडी एक वर्षांसाठी डिटेंड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
लॉकडाऊनचा इशारा
वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात लॉकडाऊन सोबतच जिल्ह्याच्या सीमा बंद कराव्या लागू शकतात, त्यामुळे नागरिकांनी अशी वेळ आणू नये, नियमांचे पालन करावे, असं आवाहनही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी केले.
15 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती आणि रुग्णालयांची व्यवस्था या संदर्भात पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, माजी आमदार अमर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, श्रीगाठे, सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ नितिन गंगणे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते.
हेही वाचा - मोठी बातमी! खासगी रुग्णालयातही Corona Vaccine; अवघ्या 250 रुपयांत मिळणार एक डोस!
वर्धा शहरात गिताईनगर, स्नेहल नगर, सिंधी मेघे, लक्ष्मीनगर, मसाळा, रामनगर, सावंगी मेघे या ठिकाणी तसेच हिंगणघाटमध्ये गांधी वॉर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, ज्ञानदा स्कूल, देवळीमध्ये रामनगर, पुलगाव, गांधी चौक पूलगाव, नाचणगाव या ठिकाणी हॉटस्पॉट असून सदर ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. सामाजिक कार्यक्रमात खास करून लग्न समारंभाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक आणि मंगल कार्यालयाच्या मालकांवर दंडात्मक कारवाई सोबतच मंगल कार्यालय सील करण्याची कारवाई सुद्धा करावी, त्यासोबतच नागरिकांनी लग्न घरच्या घरी करण्यावर जास्त भर द्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.