लातूर, 31 ऑगस्ट : राज्यात 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील रेणुका गुंडरे या विद्यार्थिनीची वेदनादायी कहाणी समोर आली होती. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर हालाखीच्या परिस्थितीतून आईने तिला शिकवलं. मात्र दुर्दैवाने दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच तिच्या आईचे निधन झाले. तर दहावीत तिला मुलीला तब्बल 94 टक्के इतके गुण मिळाले. आता हा निकाल मी कुणाला सांगू असा टाहो लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील होकर्णा येथील दुर्दैवी कु.रेणुका गुंडरे हिने फोडला होता. याच रेणुकाची भेट घेत आता उदगीर-जळकोट मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण-पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तिचं सांत्वन करत तिला आधार दिला आहे.
दहावीच्या निकालानंतर रेणुकाला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही कु.रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कोरोनातून बाहेर पडलेल्या राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जळकोट तालुक्यातील होकर्णा येथे जाऊन कु.रेणुका गुंडरे हिची भेट घेतली. 'रेणुका आता मी मंत्री नाही, तर तुझा संजू काका आहे,' असे भावनिक उद्गार यावेळी संजय बनसोडे यांनी काढले.
यावेळी बनसोडे यांनी आई-वडिलांच्या छत्र हरविलेल्या कु. रेणुकासह तिच्या दोन लहान बहिणींच्या शिक्षणाची ही जबाबदारी घेतली. मुंबईत कोरोनामुळे उपचार घेत असतानाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रेणुका गुंडरेच्या शिक्षणाच्या जबाबदारीचे आश्वासन दिले होते. आपल्या मुलीने मोठं होऊन अधिकारी व्हावं अशी रेणुकाच्या आईची इच्छा होती. रेणुकाच्या आईची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आज रेणुकाच्या घरी जाऊन राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः रेणुकाला पुढील शिक्षणासाठी निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिले. स्वतः आपल्या भागाचे आमदार तथा राज्यमंत्री आपल्या घरी आल्यामुळे आई वडिलांचे छत्र हरवलेली कु.रेणुका गुंडरेही गहिवरून गेली होती.