मृत्यूनंतरही मरण यातनाच.. छातीभर पाण्यातून न्यावी लागते अंत्ययात्रा!

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदीतील छातीभर पाण्यात वाट काढत अंत्ययात्रा नेण्याचं दुर्दैव पाडलावासीयांवर ओढवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 08:53 PM IST

मृत्यूनंतरही मरण यातनाच.. छातीभर पाण्यातून न्यावी लागते अंत्ययात्रा!

इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)

भुसावळ, 10 ऑगस्ट- एकीकडे देश चंद्रावर जाण्यासाठीची मोहीम फत्ते करतोय तर दुसरीकडे देशातील ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हेच वास्तव अधोरेखीत करणारी संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाडला खुर्द गावात घडली आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदीतील छातीभर पाण्यात वाट काढत अंत्ययात्रा नेण्याचं दुर्दैव पाडलावासीयांवर ओढवले आहे.

रावेर तालुक्यात मोडणारे पाडला खुर्द हे गाव सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेदरम्यान वसले आहे. सुमारे 1 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला आजही मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे. गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पक्क्या रस्त्यांची मागणी करूनही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. गुरुवारी (8 ऑगस्ट) गावातील कडू मंगू महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने कडू महाजन यांची अंत्ययात्रा ग्रामस्थाना गावाशेजारी असलेल्या नागोई नदीच्या छातीभर पाण्यात वाट तुडवत न्यावी लागली. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अंत्ययात्रा नदीच्या पाण्यातून नेताना काही अनुचित घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार राहिले असते, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

ग्रामस्थांची मागणी बेदखल..

पाडला खुर्द गावाची स्मशानभूमी नागोई नदीच्या काठावर दुसऱ्या बाजूला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पर्यायी पक्का रस्ता किंवा पूल नाही. त्यामुळे नागोई नदीच्या पात्रातून वाट काढावी लागते. उन्हाळा किंवा हिवाळ्यात काही त्रास नसतो. परंतु, पावसाळ्यात नदीला पाणी असते. तेव्हा खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नदीला पूर येतो, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातच ठेवावे लागते. पूर ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता किंवा लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे. परंतु, ही मागणी अद्यापही प्रलंबित आहे.

Loading...

VIDEO :..हा तर निर्लज्जपणा, राज ठाकरेंचा गिरीश महाजनांवर घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...