हरीष दिमोटे,
अहमदनगर, 5 मे- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयार गटार योजनेत सुमारे 13 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. 60 कोटींच्या या योजनेत अनेकांनी आपले हात ओले केले असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. मात्र, अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
काय आहे प्रकरण?
2014 साली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरासाठी भुयारी गटार योजना मंजूर झाली होती. 60 कोटींचा खर्च असलेली ही योजना शहरातील दक्षिण आणि उत्तर अशा दोन विभागात वाटली गेली आहे. दक्षिण आणि उत्तर विभागांतर्गत भूमिगत गटार आणि पंम्पिंग स्टेशनचे काम या योजनेत होणार होते. उत्तर विभागातील कचरा डेपोच्या जागेवर एक पंम्पिंग स्टेशनचे काम अंतिम टप्यात आहे. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरी 2015 सालीच खरेदी करण्यात आल्या आहेत. ज्या मशिनरी अशा प्रकारे चार वर्षांपासून धुळखात पडून आहेत. दुसरी गोष्ट या पॅक केलेल्या खोक्यांमध्ये नेमक्या काय मशिनरी आहेत याबाबत माहिती नाही.
सामाजिक कार्यकर्ते केतन खोरे यांनी या प्रकरणी माहीती मिळवली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या बांधकामासाठी आणि मशिनरीसाठी कोट्यवधी रुपयांचे 2015 साली बिल अदा करण्यात आले ती जागाच अजून नगरपालिकेला मिळालेली नाही. आजही ही जागा शेतीमहामंडळाच्या ताब्यात आहे.नगरपालिकेच्या ताब्यात नसलेल्या या जमिनीवर पंम्पिंग स्टेशनचा प्रकल्प साकारला जाणार आहे. मात्र, जी जागाच नगरपालिकेकडे नाही. त्या जागेवरील कामासाठी कोट्यवधी रुपये ठेकेदाराला वर्ग झालेच कसे, असा प्रश्न आहे.
केतन खोरे यांची पत्नी ज्या प्रभागातून नगरसेविका आहे, त्याच दक्षिण विभागात पंम्पिंग स्टेशनसाठी मंजूर झालेल्या या योजनेची त्यांनी माहिती घेतली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2014 साली स्वर्गीय जयंत ससाणे यांच्या पत्नी राजश्री ससाणे नगराध्यक्ष असताना ही योजना मंजूर झाली. कामही सुरू झाले. 2016 साली ससाणे गटाचा नगरपालिकेत पराभव झाला. महाआघाडीची नगरपालिकेवर सत्ता आली. भुयार गटार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने केतन खोरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्या समीतीने सहा महिन्यापूर्वीच आपला अहवालही सादर केला आहे. मात्र, काहीच कारवाई झाली नाहीय. 49 कोटी रूपयांची असलेली ही योजना 60 कोटींवर नेण्यात आली. जागा ताब्यात नसताना बिलही अदा करण्यात आले. त्यामुळे या योजनेत अनेकांनी आपले हात ओले केले असल्याचे वास्तव समोर आले आहे.
VIDEO: पार्किंगच्या कारणावरून महिलांची तुंबळ हाणामारी