Home /News /maharashtra /

Ground Report : दोन दिवसांच्या तुफानाने पीक काय मातीही नेली वाहून, होतं नव्हतं गेलं... 8 जिल्ह्यांतल्या हजारो घरा-दारांची भीषण अवस्था

Ground Report : दोन दिवसांच्या तुफानाने पीक काय मातीही नेली वाहून, होतं नव्हतं गेलं... 8 जिल्ह्यांतल्या हजारो घरा-दारांची भीषण अवस्था

अतिपावसाच्या कोकणापासून दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यापर्यंत सगळीकडेच पावसाच्या थैमानाने लवकर भरून न येणारं नुकसान झालं आहे. शेतीत उभं पीकच नाही, तर मातीही वाहून गेली. 9 बातमीदारांनी प्रत्यक्ष फील्डवरून पाठवलेल्या डोळे भरून येतील अशा गोष्टी...

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 ऑक्टोबर : "असा पाऊस आणि एवढं पाणी उभ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. काय करणार आता पुढे माहीत नाही. घरात चार दिवस तीन फूट पाणी आहे. असे पाण्यातच दिवस-रात्र काढतो आहे...." पंढरपूरच्या पवार वाड्यातले ज्ञानेश्वर पवार सांगत होते.  मुसळधार पावसानं पंढरपूरला झोडपलं. ते पाणी ओसरत नाही, तोवर आता नदीत सोडलेल्या पाण्याने पूर आला. सलग चार दिवस वीज, पिण्याचं पाणी याशिवाय काढणारे पवार News18 चे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांच्याशी त्या पाण्यातूनच बोलताना त्यांच्या दारात पाण्यावर तरंगणारे गॅस सिलेंडर, धान्याचे डबे हे सगळं आजूबाजूला स्पष्ट दिसत होतं. कॅमेरामनला 'तिथे कट्टा आहे. कॅमेरा भिजणार नाही. त्यावर उभं राहा', असं सांगताना त्यांचा 22 जणांच्या पवार वाड्यातला संसार मात्र पूर्ण पाण्यात गेलेला  दिसत होता. उत्पात यांनी पाठवलेली पंढरपूरची  भीषण म्हणावीत अशीच आहेत. तलावच वाहिला, आता कसली शेती? तीच गोष्ट पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या अनेक गावांची. मदनवाडी इथला ब्रिटीशकालीन तलाव एरवी शेतकऱ्यांच्या गरजेला धावून येतो. पण मुसळधार पावसाने हा जुना तलाव भरून वाहिला आणि सांडव्याची भिंतच फुटली. अत्यंत वेगानं वाहणारा पाण्याचा लोंढा आसपासच्या शेतात घुसला. त्यामुळे शेतकऱ्याचा बापाच्या काळजाने जपलेला ऊस मुळासकट उखडला गेला आणि प्रवाहाबरोबर वाहात ओढ्या- नाल्यातून थेट उजनीपर्यंत पोहोचला, ही हादरवणारी दृश्य इंदापूरचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी पाठवली आहेत. आता पुढच्या हंगामात मदनवाडी बरोबरच अनेक गावातील शेतकऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागणार आहे. कारण त्यांचा हक्काचा तलावच आता राहिलेला नाही. महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, जालना, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मृतदेह हलवणंही अवघड दर वेळी उजनीतून पाणी सोडलं की पंढरपूरला पुराचा वेढा पडतो. पण या वेळी मुसळधार पाऊस आणि चंद्रभागेचा पूर दोन्ही एकदम आले आणि अनपेक्षितपणे पाण्याची पातळी वाढली. पंढरपूरमध्ये भीमा नदीचंर पाणी पात्र सोडून अर्धा ते पाऊण किलोमीटर पसरलं आहे. पांडुरंगाच्या मंदिराचा प्रदक्षिणा मार्गावर पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्याने इथे लगेच पाणी भरण्यास सुरुवात होते. याच भागात बंकटस्वामी मठाजवळील एका घरात वृद्धाचा मृत्यू झाला होता. पण पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढणंही शक्य झालं नाही. शेवटी दोन दिवसांनी रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलेल्या पथकाने मृतदेह हलवला. सोलापूरला दुहेरी फटका एरवी कमी पावसाचा समजला जाणारा सोलापूर जिल्हा या दोन दिवसांच्या तुफानाता पुरता भिजून गेला आहे. राज्यभर झालेल्या वादळी पावसाने काय अवस्था झाली आहे, हे पाणी ओसरल्यावर आता समोर येत आहे. सुगीच्या दिवसांची वाट पाहात असतानाच तोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून घेतला. सततच्या दुष्काळी भागांत या दोन दिवसात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर कोकणासारख्या अतिपावसाच्या प्रदेशातही अनपेक्षितपणे आलेल्या तुफानाने सगळं भाताचं पीक वाहून गेलं. कोल्हापूरची भातशेती आडवी कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या महापुरानंतर इथल्या शेतकऱ्याला सलग दुसऱ्या वर्षी पावसाने प्रचंड मोठा फटका दिला आहे. भाताचं आगार असलेल्या जिह्ल्यात भातपीक आडवं झालं आहे. सोयाबीन, ऊससुद्धा पुरता मोडून पडला आहे. कोकणात भात झाला आडवा, मासेमारीही थांबली रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये चार दिवस पाऊस झाला. सगळी भातशेती जमीनदोस्त झाली आहे. या भीषण परिस्थितीचा आढावा घेतला चंद्रकांत बनकर यांनी. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास या वादळी पावसाने हिरावला. स्वप्नील घाग या प्रतिनिधीने सांगितलं की, भात पीक कापणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापून सुकवण्यासाठी शेतात ठेवलेलं भातपीक या पावसाने मातीमोल झालं आहे. अनेक ठिकाणी शेतीला कोंब देखील फुटले आहेत. वादळी पावसामुळे कोकणात उभी पिकं आडवी झाली. जवळपास 40% शेतकरी या भातपिकावर अवलंबून असल्यामुळे आता काय करायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पुणे जिल्ह्याची दयनीय अवस्था इंदापूर, भिगवण, दौंड, बारामती तालुक्यांतल्या शेतांची या पावसाने दैना उडवली आहे. हा प्रामुख्याने ऊस शेतीचा परिसर. शेतातला उभा ऊस या तडाख्याने झोपवला आहे. शेतीबरोबर जोडधंद्यांचंही न भरून येणारं नुकसान झालं. बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी अशीच भीषण गोष्ट समोर आणली आहे. तालुक्यातल्या सोनवडी सुपे इथल्या कांतीलाल पांडुरंग भापकर यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय. त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्येच पाणी शिरलं आणि  3000 पिलांचा मृत्यू झाला. मराठवाड्यात ओला दुष्काळ अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली त्या मराठवाड्यावर या वेळी निसर्ग उदार झाला होता. यंदा पाऊस चांगला झाला असं म्हणेपर्यंतच दोन दिवसाच निसर्गाने त्याचा प्रकोपही दाखवून दिला. मराठवड्यात दोन दिवस झालेल्या पावसात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला. 147 जनावर दगावली आणि 124 घरांचे नुकसान झालं, असं सरकारी आकडेवारी सांगते.  सोयाबीन,बाजरी, मका, कपाशी, तूर,उडीद, केळी या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात 4 लाख 99 हजार 648 हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 176 हेक्टर आणि  नांदेड 1 लाख 10 हजार 685 हॅक्टरचं नुकसान नोंदवलं गेलं आहे. जालन्याचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी तिथल्या पांढऱ्या सोन्याची म्हणजे कापसाच्या पिकाची काय अवस्था झाली ते टिपलं आहे. 10 महिने शेतकरी या पांढऱ्या सोन्यासाठी राबला. त्यातून आता जेमतेम 7500 रुपये मिळतील, एवढीच अपेक्षा उरली आहे. जालना जिल्ह्यातील बळीराजाची अवस्था अतिवृष्टीमुळे अधिकच बिकट झाली. जास्तीच्या पावसामुळे कपाशीची बोंडं करपली, पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, उरल्या-सुरल्या कापसाची विक्री करून कसा तरी उदरनिर्वाह करावा म्हटलं तर मार्केट फेडरेशनकडून अद्याप खरेदी सुरू करण्यात आली नाही. आणखी वाट पाहावी म्हटलं तर आकाशात अजूनही काळे ढग आणि पावसाचं सावट पुरतं शमलेलं नाही. आहे ते पीकंसुद्धा हातातून जाण्याची भीती. अखेर नाईलाजास्तव खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन कवडीमोल भावात आपल्या पांढऱ्या सोन्याची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे.  बीडमध्ये पाण्यातच गेली आसवं बीड जिल्ह्यात पावसाने खरीप हंगामातलं अवघं पीक खाल्लं 'आता कसली दिवाळी आणि कसला दसरा', असं तिथल्या  शेतकऱ्यांनी हताश होत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना सांगितलं.  बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कापूस आणि सोयाबीन पिकांचं झालं आहे. बीड तालुक्यातील सिदोड गावात गुडघाभर पाणी पाण्यात उभा असलेला शेतकरी डोळ्यातून पाणी काढत त्या पाण्याकडे बघतो तेव्हा अक्षरशः आतून हलायला होतं.  उस्मानाबादमध्ये हाहाकार उस्मानाबादमध्ये या तुफानाने कहर केला. उमरगा, लोहा तालुक्यातल्या नद्या पात्र सोडून वाहात आहेत. त्या पूर्वपदावर येत असताना त्याखाली गेलेल्या शेतीचं भीषण दृश्य अंगावर येत आहे. News18 चे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी सांगितलं की, अजूनही तेरणा, बेनितुरा नद्यांमध्ये पाणी पातळी ओसरलेली नाही. पात्र सोडून 1 किलोमीटर पलीकडे पाणी वाहिलं आहे. पाणी ओसरतंय तसं शेतकरी आता आपापल्या सोयाबीनच्या गंजी शोधत फिरत आहेत. लोहारा तालुक्यातील सास्तुर गावात पूर्ण वाढ, कापणी होऊन शेतात काढून ठेवलेल्या गंजीच्या गंजी पाण्यात वाहून गेल्या आहेत. ओढ्यांचं पाणीदेखील प्रमाणाबाहेर वाढल्याने ते शेतात धुसलं आणि अवघं पीक घेऊन गेलं. आता पाणी ओसरत आहे, तसं पुलाच्या बाजूला अडकून पडलेल्या या गंजी दिसत आहेत. शेतकरी त्याकडे हतबल नजरेनं पाहण्याखेरीज काहीच करू शकत नाही. भविष्यकाळही मातीबरोबर वाहिला उस्मानाबादेत पावसाने होत्याचं नव्हतं केलं आहे. दोन दिवसांचा फटका भविष्यकाळात कितीतरी वर्षं सोसावा लागणार, अशी चिन्हं आहेत. कारण केवळ शेती आणि पीकच नाही तर शेतातील जमिनीवरची काळी माती सुद्धा वाहून गेली आहे. लोहारा तालुक्यातील वडगाव मधील दीडशे एकर जमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (या ग्राउंड रिपोर्टसाठी संदीप राजगोळकर, वीरेंद्र उत्पात,  सुरेश जाधव, मधुकर गलांडे , बालाजी निरफळ, विजय कमळे पाटील, जितेंद्र जाधव, चंद्रकांत बनकर, स्वप्नील घाग यांनी माहिती दिली. )
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Marathwada, Pandharpur, Pune, Rains

    पुढील बातम्या