Ground Report : दार उघड बये! बंद मंदिरांमुळे जगणं झालं मुश्कील; कोट्यवधींचं नुकसान कशी सहन करताहेत मंदिरांची गावं?

Ground Report : दार उघड बये! बंद मंदिरांमुळे जगणं झालं मुश्कील; कोट्यवधींचं नुकसान कशी सहन करताहेत मंदिरांची गावं?

मंदिरांची गावं म्हणून ओळखली जाणारी तुळजापूर, अंबाजोगाई, माहूर यांची अर्थअवस्था ऐन नवरात्र उत्सवात भीषण झाली आहे. कोल्हापूर, पुण्यातही उत्सवकाळात होणारी 50 कोटींची उलाढाल यंदा ठप्प असेल. 8 ठिकाणच्या प्रतिनिधींनी दिलेला ग्राउंड रिपोर्ट

  • Share this:

कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, पुणे 16 ऑक्टोबर : 'घटस्थापनेनंतर दसऱ्यापर्यंत इथे पाय ठेवायला जागा उरत नाही. वर्षभराची कमाई आमची याच सीझनला होते. यंदा मात्र काहीच नाही. मंदिराच्या बंद दाराआड आमची कमाईही थंड झाली आहे. नवरात्रानंतर मंदिरं उघडली तरी फारसा फरक पडणार नाही', निराशेच्या सुरात भवानी मातेच्या दारातले दुकानदार सांगतात. फक्त हार-फुलं- प्रसादाची दुकानं नव्हे, तुळजापूर परिसरात खेळणी, पूजासाहित्यापासून, रेस्टॉरंट्स, हॉटेल, लॉज अगदी पार्किंगचा व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांनाच यंदा उपासमार टाळण्यासाठी इतर उद्योगांकडे वळावं लागलं आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन पीठांची स्थानं असणारी मंदिरं या वेळी प्रथमच नवरात्रातही ओस पडलेली दिसणार. राज्यभरातल्या देवस्थानांची तीच अवस्था आहे. नवरात्र आणि दसऱ्यानंतर दिवाळी सोडता मोठा उत्सव नसतो. यावर्षीचे सगळे सण कोरोनाच्या छायेचतच गेले. आता हा दिवाळीपूर्वीचा हा सणही बंदिस्त दारांमागेच साजरा होणार.

10 दिवसात व्हायची 6 कोटींची उलाढाल

उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र काळात एकट्या तुळजापुरात जवळपास 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल होते. नवरात्र उत्सवासाठी राज्यभरातून भाविक येतात. शिवाय कर्नाटक राज्यातूनही लाखो भाविक तुळजापूर येतात. राहतात.

पण गेले 7 महिने तुळजाभवानीचं मंदिर बंद असल्याने दुकानात शुकशुकाट दिसतो. दुकानदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

ग्राहक शोधण्याची वेळ

सुरुवातीला कडक lockdown च्या काळात तर मंदिर परिसरांत शुकशुकाट असायचा. फक्त पुजारी आणि देवस्थानच्या ट्रस्टींचं मंदिरात जाणं-येणं असे. आता मात्र महाराष्ट्रात Unlock सुरू झाल्यानंतर तुरळक गर्दी व्हायला लागली आहे. लांबून कळसदर्शन घ्यायला स्थानिक येतात. बाहेरगावहून आलेले पायऱ्यांसजवळ फोटो काढून घेतात. त्यामुळे पूजासाहित्याची दुकानं पुन्हा उघडली आहेत खरी. पण कमाईच्या दिवसात ग्राहक शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दानही आटलं, पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पोटाची खळगी भागवण्यासाठी हे दुकानदार शेतीसह इतर ठिकाणी रोजंदारीवर काम करताना दिसत आहेत.  मंदिर संस्थानामध्ये येणारं दान देखील कमी झाल्याने कर्मचारी -पुजारी यांच्या वर ही उपासमारीची वेळ आली आहे. तुळजापूर हे जिल्ह्याच्या अर्थकारणाचं केंद्र. पण ते आता आर्थिक संकटात आहे.

कोल्हापुरात देवस्थानसह स्थानिकांचं कोट्यवधींचं नुकसान

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर राज्यातलं महत्त्वाचं देवस्थान. नवरात्र काळातही यंदा मंदिर बंदच आहे. या दहा दिवसात एरवी भाविकांकडून भरभरून देणग्या, देवीचे दागिने आणि दानपेटीतही मोठी रक्कम उभी राहते. यंदा यातलं कुठलंच उत्पन्न देवस्थानला मिळणार नाही. नवरात्रीच्या काळात मंदिर बंद राहिल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे दीड ते पावणे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ही माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी News18 चे कोल्हापूर प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांना दिली. एरवी या काळात कोल्हापूर शहरात लाखो पर्यटक आणि भाविक येत असतात. त्यावर अवलंबून लॉज, हॉटेल, रिक्षा, पार्किंग असं सगळंच यंदा बंद आहे. मंदिराच्या परिसरातील अनेक दुकानं अजूनही बंदच आहेत.  परिसरातील  व्यापाऱ्यांची पाच ते सात कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

माहुरगडावर 130 कुटुंबांता उदरनिर्वाहच बंद

नांदेड जिल्ह्यातलं माहुरगड हे रेणुका मातेचं स्थान. राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. फक्त नवरात्रच नाही वर्षभर इथे भाविकांची गर्दी असते. नवरात्रादत नऊ दिवस- रात्र भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते . पण यंदा कोरोनामुळे मंदिर बंद आहे. संपूर्ण माहूर शहरातील व्यापार ठप्प आहे. मंदिर परिसरातल्या एकूण 130 दुकानांचा पूर्ण उदरनिर्वाहच त्यामुळे बंद आहे.

आता हे दुकानदार परिसरातील उदरनिर्वाह चालवण्यासाठी अन्य, मिळतील ती कामं करत आहेत. कोणी शेतात मजुरीला जात आहे, तर कुणी गवंडीकाम करत आहे. शहरात 50 हून अधिक लॉज आणि त्याहून अधिक हॉटेल्स आहेत, असं आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी सांगितलं. शेकडो जणांचा व्यवसाय, रोजीरोटी त्यावर चालते. आता भाविक नाहीत. नवरात्रात तरी किमान मंदिरं उघडतील, अशी आशा त्यांना होती. पण ती आता मावळली. त्यामुळे जगायचं कसं असाच प्रश्न  इथले व्यावसायिक विचारत आहेत.

अंबाजोगाईत 10 दिवसांत व्हायची 3 कोटींची उलाढाल

अंबेजोगाईत नवरात्रीच्या काळात लाखो भाविक फक्त योगेश्‍वरी देवीच्या दर्शनाला येतात.  10  दिवसांच्या यात्रेतून लहान-मोठ्या व्यावसायिकांचं वर्षभराचं आर्थिक नियोजन ठरलेलं असतं. ते सगळं यंदा कोरोनामुळे बारगळलं. शेकडो व्यापाऱ्यांच्या समोर आर्थिक संकट उभा राहिलं आहे.

देवीच्या दर्शनासाठी दररोज 30 ते 40 हजार भाविक येत असतात. 10 ते 15 लाख भाविक येतात. त्यांच्यावर आणि दक्षिणा, पूजा अभिषेक यावर पुरोहित आणि मंदिर व्यवस्थापनाची आर्थिक उलाढाल अवलंबून असते.

तब्बल 2 ते 4 कोटींची उलाढाल फक्त उत्सवकाळात होत असते, असं देवल कमिटीचे अध्यक्ष आणि तहसीलदार संतोष रुईकर आणि  अॅड शरद लोमटे यांनी News18 चे बातमीदार सुरेश जाधव यांना सांगितलं.

पुण्यात 30 कोटींच्या उलाढालीवर पाणी

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एकट्या पुणे शहरात अंदाजे तीस कोटींची आर्थिक उलाढाल व्हायची, पण यंदा कोरोनाच्या साथीमुळे या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार आहे, अशी माहिती पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे देतात. एकट्या चतुशृंगी देवीच्या यात्रेलाच 9 दिवसात किमान लाखभर भाविक दर्शनाला येतात. नवरात्रात तिथे मोठी जत्रा भरते. शेजारच्या गावातले फिरते व्यावसायिकही त्यानिमित्ताने वर्षातली मोठी कमाई म्हणून या दिवसात चतुःशृंगीला येतात. हार-फुलंवाले, अगरबत्ती, देवीचा प्रसाद तसंच खणानारळाची ओटी, बांगड्या, साडी चोळी अशा पूजा साहित्याची किमान शे-दोनशे दुकानं थाटतात. यासोबतच पाळणेवाले, खेळणीवाले, आइस्क्रीम, भेळवाले, पावभाजी अशी लहानमोठी धरून पाचशे दुकानं दहा दिवसांचा व्यवसाय करतात.

देवी दर्शनाला आलेल्या एका माणसाने किमान शंभर रुपये खर्च केले तरी एकट्या चतुःशृंगी यात्रेची नवरात्रातली आर्थिक उलाढाल 5 कोटींच्या घरात जाते, असं जाणकार सांगतात. पुण्यात अशी किमान सहा सात देवीची मंदिरं आहेत. त्यात ग्रामदेवका तांबडी जोगेश्वरी, सारसबागेची महालक्ष्मी, कोथरूडचं वणी, भनानी पेठेतलं भवानी माता मंदिर इथे मोठा उत्सव असतो. यंदा कोरोनामुळे देवीची मंदिरंच बंद असल्याने तुरळक व्यवसाय सोडता सगळं बंद आहे.

यासोबतच पुण्यात नवरात्रात देवी बसवणारी लहाणमोठी धरून 2000सार्वजनिक उत्सव मंडळं आहेत. ही सर्व मंडळं दरवर्षी देवीची नवी मूर्ती खरेदी करतात, चौकाचौकात मंडप टाकतात. विद्युत रोषणाई करतात. एका मंडळाची नवरात्रातातली आर्थिक उलाढाल सरासरी एक लाख रुपये धरली तरी हाच आकडा 20 कोटींच्या घरात जातो. Coronavirus ची भीती आणि बंद मंदिरं यामुळे कोट्यवधींचं अर्थचक्र या वेळी थांबलं आहे.

वज्रेश्वरीत होते लाखोंची उलाढाल

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात भाविकांच्या नवसाला पावणारी देवता अशी ख्याती असलेल्या वज्रेश्वरी योगिनी देवीचा यात्रा उत्सव सोहळा प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर  लॉकडाऊनमुळे गेल्या सात महिन्यापासून मंदिर बंद आहे. त्यामुळे वज्रेश्वरी ,  गणेशपुरी, अकलोली या धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर शुकशुकाट आहे. इथले गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. सर्व व्यवहार, व्यवसाय 7 महिन्यापासून  ठप्प असल्याने येथील 20 हजार गावकऱ्यांवर उपासमारीचं संकट आलं आहे. "नवरात्रापर्यंत सगळं सुरळीत होईल, अशी आशा होती. दुकानं उघडली आहेत. पण व्यवसाय नाही", तिथले व्यावसायिक सांगतात. नवरात्र काळात गुजरातमधूनही वज्रेश्वरीला भाविक येतात. सुमारे 20 लाखांची उलाढाल या 10 दिवसांत होते.

कार्ल्याची एकविरा देवी फक्त 27 कुटुंबांना दिसणार

लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी कार्ला गडावर आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात होतो. यंदा मात्र कार्ला गडावर प्रशासकीय समितीच्या आवाहनाप्रमाणे नोंदणी झालेल्या दररोज तीन भाविक दांम्प्त्यांच्या हस्ते पूजा केली जात आहे. एकविरा देवीचे भक्त राज्यभर आहेत.यामध्ये आग्री, कोळी, चौल, या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते.

एकवीरा देवीच्या गडाच्या पायथ्याला हार फुलं नारळ देवीची ओटीचं साहित्य विकणाऱ्या कुटुंबांवर यंदा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पायथ्याची जवळपास 40 दुकानं बंद असल्याने 50 लाख ते 1 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.

वेहेरगाव कार्ला या गावातील अर्थकारणाचं चक्र एकवीरा देवी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असतं. परंतु यंदा प्रशासनाच्या निर्णयानुसार केवळ नोंदणीकृत 27 कुटुंबांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. इतर भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. सहा महिन्यापासून बंद असलेला व्यवसाय नवरात्रात सुरू होईल अशी अपेक्षा असणाऱ्या व्यावसायिकांचा निराशा झाली आहे. मंदिरांच्या गावांचं अर्थचक्रच जणू थांबलं आहे.

(या ग्राउंड रिपोर्टसाठी संदीप राजगोळकर, चंद्रकांत फुंदे, बालाजी निरफळ, सुरेश जाधव, रवी शिंदे, मुजीब शेख, अनिस शेख, विजय राऊत यांनी माहिती दिली.)

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 19, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या