2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळही येईना, हृदयद्रावक VIDEO

2 दिवसांपासून अन्नपाण्याविना आजी गोठ्यात पडून; कोरोनाच्या भीतीनं कोणी जवळही येईना, हृदयद्रावक VIDEO

Emotional Video: घरातील सर्वजण कोरोना बाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पाठिमागे घरात राहिलेल्या एकट्या वयोवृद्ध आजीचे अत्यंत वाईट हाल झाले आहेत.

  • Share this:

बीड, 16 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णाचा (Corona cases in Maharashtra) आलेख वाढतचं चालला आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. याचा समाजातील विविध घटकांवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) अत्यंत संसर्गजन्य असल्यानं घरातील एकाला कोरोनाची लागण झाल्यास कुटुंबातील अन्य लोकांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे घरातील एका व्यक्तीची चूक कुटुंबीयांना भोगावी लागत आहे.

सध्या राज्यात हजारो कुटुंबे कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यामुळे त्यांना सहपरिवार रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. अशात घरातील कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या वयोवृद्धांची आणि लहान लेकरांची मोठ्या प्रमाणात होरपळ होतं आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातील नाळवंडी याठिकाणी घडली आहे. घरातील सर्वजण कोरोना बाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. दरम्यान पाठिमागे घरात राहिलेल्या एकट्या वयोवृद्ध आजीचे अत्यंत वाईट हाल झाले आहेत.

संबंधित आजी घरात एकट्याचं असल्यानं त्यांना स्वतःसाठी जेवणही बनवता आलं नाही. त्यामुळे त्यांना तब्बल दोन दिवस अन्नपाण्याविना कुढत जगावं लागलं आहे. दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे इच्छा असूनही मदत करता येत नाही, अशी स्थिती शेजारच्यांची होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या आजीला मदत करण्यास कुणीही पुढे सरसावलं नाही.

हे ही वाचा-तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO

या घटनेची माहिती गावातील रहिवासी विजयसिंह बांगर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आजींना रुग्णालयात दाखल केलं आहे. यानंतर आजीची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्यांना खाऊ पिऊ घातलं असून त्यांची प्रकृती बरी आहे. कोरोनाच्या काळात आपली नाती तुटत असताना या तरुणांनी माणुसकीचा धर्म निभावत या वयोवृद्ध आजीला मायेचा आधार दिला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 8:46 AM IST

ताज्या बातम्या