अजित मांढरे, प्रतिनिधी
ठाणे, 17 जानेवारी : कल्याणमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इमारतीमध्ये घराला लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली.
मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर घरात झोपलेल्या 70 वर्षीय महिला आजी आणि तिची 22 वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल. मात्र, तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. खातीजा हसम माइमकर (वय-70) आणि इब्रास रौफ शेख (वय-22) अशी मृतांची नावे आहेत.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिल्ली दरबार हॉटेल जवळ, शफीक खाटी मिटी इमारत, घास बाजार, अण्णासाहेब वर्तक रोड, कल्याण (प.) येथे आज पहाटे 3.35 वाजताच्या सुमारास शफीक खाटी मिटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुम क्रमांक 303 यांच्या रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती.
हेही वाचा - मुलगी घर सोडून पळून जाते, बापाने समजावून सांगण्याऐवजी उचलले भयावह पाऊल, नाशिक हादरलं
सदर घटनास्थळी कल्याण अग्निशमन दलाचे जवान 2-फायर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सदरची आग 05.35 वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविली आहे.
मृतांची माहिती पुढीलप्रमाणे :-
खातिजा हुसेन माहीमकर (स्त्री./वय- 73 वर्षे)
ईब्रास अब्दुल राऊफ शेख (स्त्री./ वय 22 वर्षे)
वरील दोन्ही महिलांना रुखमीन हॉस्पिटल, कल्याण येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.