मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड, 16 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या (gram panchayat election 2021) कारणावरून नांदेडमध्ये एका गावात तुफान दगडफेक झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. लोहा तालुक्यातील जानापुरी इथे दोन गट आपसात भिडले आणि त्यातून दगडफेक झाली. या दगडफेकीत जानापुरी गावातील 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यात महिला आणि लहान मुलांनाचा देखील समावेश आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. पण मतदानाच्या वेळी झालेला वाद आज पुन्हा उकरून काढण्यात आला. सुरुवातीला दोन्ही गटात वाविवाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांनावर दगडफेक सुरू केली. यात महिलांनी देखील सहभाग घेत जोरदार दगडफेक केली. गावात उडालेल्या धुमश्चक्रीमुळे एकच खळबळ उडाली. गावात सध्या तणावाचे वातावरण आहे.
या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी जानापुरी गावात बंदोबस्त वाढवला आहे. याच गावाला लागून असलेल्या आणखी एका गावात देखील दोन गटात मारामारी झाली.बिलोली तालुक्यातील मुतण्याळ गावात ग्राम पंचायत निवडणुकीच्या वादातून हाणामारी आणि दगडफेक झाली. या गावात मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या वेळी पण दोन गटात वाद झाला होता. आज पुन्हा वाद होऊन मारामारी आणि दगडफेक झाली.
पोलिसांसमोरच दोन्ही गटातील लोकं लाठ्या काठ्या घेऊन भिडले. पोलीस कमी आणि गावकरी जास्त असल्याने पोलिसांना देखील काहीच करता आलं नाही. दोन्ही कडून तुफान दगडफेक देखील झाली. या दगडफेकीत जवळपास 35 जण जखमी झाले आहे. या घटनेनंतर गावात तणाव आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दगडफेक करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परस्पर विरोधी गटाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया आता सुरू आहे.
शिवसेना-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फोडली एकमेकांची डोकी
तर मुंबई जवळील भिवंडीमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भर रस्त्यावर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत असताना सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्याने एकमेकांवर हल्ला चढवला. एवढंच नाहीतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.