जालन्यात शासनाच्या आदेशाला केराची टोपली, कोरोना संसर्गाला जणू खुले आमंत्रण

जालन्यात शासनाच्या आदेशाला केराची टोपली, कोरोना संसर्गाला जणू खुले आमंत्रण

शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

  • Share this:

जालना, 15 मार्च : कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात काही शहरांमध्ये पसरत असल्याने एकच खळबळ माजली आहे. अशातच जालना नगर पालिकेकडून मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जालन्यामध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

गर्दी जमून एक-मेकांच्या संपर्कात येऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध सूचना केल्या आहेत. आजपासून 31 मार्चपर्यंत नगर पालिका, नगर पंचायत हद्दीतील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. विविध प्रकारचे शासकीय,सामाजिक,राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक बाजारांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र असे असताना जालना नगर पालिकेकडून मात्र शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे. आज शहराच्या मधवस्तीत भर रस्त्यावर आठवडी बाजार भरवण्यात आला होता आणि ते ही थेट जालना नगर पालिकेच्या कार्यालयाच्या दारात. अशा प्रकारे बाजाराच्या माध्यमातून गर्दी जमू न देण्याची जवाबदारी ज्यांच्याकडे आहे त्याच नगर पालिकेच्या कार्यलयासमोर राजरोसपणे हा कोरोना संसर्गाचा बाजार मांडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हेही वाचा- औरंगाबादमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 32 वर

शहरातील रेल्वे स्टेशन जवळील टिपू सुलतान चौकापासून ते थेट गांधी चमन पुतळ्यापर्यंत आज हा रविवारचा बाजार भरवण्यात आला होता. सुमारे 200 च्या आसपास भाजी विक्रेते या बाजारात आपला माल घेऊन आले होते, तर मोठ्या संख्येने ग्राहक देखील खरेदीसाठी सहभागी झाले होते. दर आठवड्याच्या तुलनेत आज ग्राहकांची संख्या जरी रोडावली असली तरी कोरोना संसर्गासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास पुरेशी गर्दी तेथे जमली होती.

याठिकाणी नगर पालिका किंवा आरोग्य विभागाकडून कुठल्याही प्रकारची कोरोना प्रतिबंधक उपाय योजना अथवा जनजागृती याठिकाणी करण्यात आली नव्हती. एकीकडे सरकार कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना करत असताना त्याच्या अंमलबजावणीसाठी संमबंधित यंत्रणेला रीतसर लेखी सूचना देऊन देखील त्यावर अंमलबजावणी करण्यात जालना नगर पालिकेकडून सपशेल दुर्लक्ष केला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

First published: March 15, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या