मुंबई, 23 डिसेंबर : ख्रिसमस सण साजरा करण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत. यंदा ख्रिसमस सण साध्या पद्धतीने साजरा करतानाच चर्चमध्ये 50 पेक्षा जास्त लोक प्रार्थना सभेला उपस्थित राहू नये, तसंच चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सामाजिक सुरक्षिततेचे अंतर आणि नियमावलीचं काटेकोर पद्धतीने पालन व्हावं, असे आदेश देण्यात आले आहेत.
ख्रिसमस साजरा करताना या 8 गोष्टी लक्षात ठेवा!
1. ख्रिसमस सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जीवनावरील देखावे, क्रिसमस ट्री किंवा इतर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स आणि स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
2.चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुती गीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्या वेळी वेगवेगळ्या माहितीचा वापर करून सामाजिक सुरक्षित अंतर नियमावली काटेकोर पाळली जावी, असेही या आदेशात म्हटलं आहे.
3. चर्चच्या परिसरामध्ये दुकाने उभारली जाऊ नयेत.
4. 60 वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील लहान बालकांनी सुरक्षितेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराच्या बाहेर जाणे टाळावे.
5. या सर्वांनी घरांमध्येच नाताळ साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
6. नाताळच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी करू नये.
7. प्रदूषणाबाबत सर्व नियमावली पाळण्यात यावी.
8. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना स्थळे ही मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी सात वाजता किंवा त्याआधीच करण्यात यावे, असंही या आदेशात म्हटलं आहे.